IND vs ENG 1st Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. फिरकी गोलंदाज शोएब बशीरला ( Shoaib Bashir ) इंग्लंडमध्ये परतावे लागले. व्हिसाच्या समस्येमुळे तो भारतात येऊ शकला नाही. यामुळे कर्णधार बेन स्टोक्सने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भारत-इंग्लंड पहिली कसोटी २५ जानेवारीपासून हैदराबादमध्ये सुरू होणार आहे. भारताला पराभूत करण्यासाठी इंग्लंड संघाने २० वर्षीय फिरकीपटूला संघात स्थान दिले होते, परंतु तो पहिली कसोटी खेळू शकणार नाही.
स्टोक्स म्हणाला की, आम्ही डिसेंबरमध्ये संघाची घोषणा केली होती आणि बशीरला येथे येण्यासाठी व्हिसा मिळत नाही. मी त्याच्यासाठी निराश आहे. तो कसोटी खेळण्यासाठी खूप आतुर होता, परंतु आता त्याला कसे वाटत असेल, हे मी अनुभवू शकतो. पण, अशा परिस्थितीतून गेलेला तो पहिला क्रिकेटपटू नाही. मी अशा अनेकांसोबत खेळलो आहे की ज्यांच्यासोबत हे घडले आहे. आम्ही निवडलेला खेळाडू संघात नाही हे मला खूप विचित्र वाटते.
इंग्लंडचा उर्वरित संघ रविवारी अबुधाबीहून भारतात पोहोचला आणि त्यांनी सरावाला सुरुवात केली. इंग्लंड संघात आणखी एक युवा फिरकी गोलंदाज रेहान अहमद हा स्टँडबाय म्हणून संघात आहे. या प्रकरणी इंग्लंड संघाचे मुख्य प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम म्हणाले,''ईसीबीने भारत सरकार आणि बीसीसीआयला या प्रकरणाची माहिती दिली आहे. २४ तासांच्या आत समस्या दूर होईल अशी आशा आहे. मंगळवारपर्यंत बशीरसोबत डॅन लॉरेन्सही भारतात पोहोचेल, अशी आशा व्यवस्थापनाला आहे.''
बशीरला देशांतर्गत क्रिकेटचा फारसा अनुभव नाही, आतापर्यंत तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये फक्त १० विकेट घेऊ शकला आहे. मात्र, यूएईमध्ये इंग्लंड लायन्सकडून खेळताना त्याने चांगली कामगिरी केली.
इंग्लंडचा संघ - बेन स्टोक्स ( कर्णधार), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गुस एटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, शोएब बशीर, हॅरी ब्रूक, झॅक क्रॅवली, बेन डकेट, बेन फोक्स, टॉम हार्टली, जॅक लिच, ऑली पोप, ऑल रॉबिन्सन, जो रूट, मार्क वूड
IND vs ENG Test Series
२५ ते २९ जानेवारी - हैदराबाद, सकाळी ९.३० वाजल्यापासून०२ ते ०६ फेब्रुवारी - विशाखापट्टणम, सकाळी ९.३० वाजल्यापासून१५ ते १९ फेब्रुवारी - राजकोट, सकाळी ९.३० वाजल्यापासून२३ ते २७ फेब्रुवारी - रांची, सकाळी ९.३० वाजल्यापासून७ ते ११ मार्च - धर्मशाला, सकाळी ९.३० वाजल्यापासून