Big blow to KKR: ऑस्ट्रेलियाचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार पॅट कमिन्स व्यस्त आंतरराष्ट्रीय वेळापत्रकामुळे पुढील वर्षी होणाऱ्या IPL 2023 ला मुकणार आहे. पॅट कमिन्सने (Pat Cummins) मंगळवारी सकाळी Twitter वरून याबाबतची घोषणा केली. त्याने ट्विटमध्ये जाहीरपणे म्हटले आहे की, तो दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात रंगणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या देशांतर्गत T20 लीगमध्ये म्हणजेच IPL मध्ये खेळणार नाहीये.
2023चे क्रिकेट कॅलेंडर ऑस्ट्रेलियासाठी खूप व्यस्त आहे. यामध्ये भारताचा कसोटी दौरा, अॅशेससाठीचा इंग्लंड दौरा आणि भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा समावेश आहे. यामुळे पॅट कमिन्स IPL 2023 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) खेळू शकणार नाही. पॅट कमिन्सने ट्विटमध्ये लिहिले की, 'पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये न खेळण्याचा मी निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेणे माझ्यासाठी जड होते. पण आंतरराष्ट्रीय वेळापत्रक पुढील १२ महिन्यांसाठी कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांनी भरलेले आहे, त्यामुळे अॅशेस मालिका आणि विश्वचषकापूर्वी थोडी विश्रांती घेण्याच्या उद्देशाने मी हा निर्णय घेत आहे.'
कमिन्सने आणखी एका ट्विटमध्ये लिहिले की, 'माझी समस्या समजून घेतल्याबद्दल कोलकाता नाइट रायडर्सचे खूप खूप आभार. खेळाडू आणि कर्मचार्यांचा विचार करणारा हा अद्भुत संघ आहे. मी लवकरात लवकर तिथे परत येण्याची आशा करतो.'
पॅट कमिन्सने २०१४ मध्ये शाहरुख खानच्या कोलकाता नाइट रायडर्स (KKR) मधून आयपीएल पदार्पण केले. पॅट कमिन्स २०१८ आणि २०१९ वगळता २०१४ पासून आयपीएलचा भाग आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने कोलकाता नाईट रायडर्सकडून ६ पैकी ५ सीझन खेळले आहेत. कमिन्स आयपीएल २०१७ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळला होता. IPL 2022 च्या मेगा लिलावात KKR ने पॅट कमिन्सला ७.२५ कोटींना अष्टपैलू कॅटेगरीत विकत घेतले होते.
पॅट कमिन्सने कोलकाता नाईट रायडर्सकडून मागील तीन आयपीएल हंगाम खेळले आहेत. कमिन्सने गेल्या वर्षी पुण्यात IPL 2021 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध १४ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. कमिन्सने या पराक्रमामुळे केएल राहुलच्या आयपीएलमधील आतापर्यंत सर्वात जलद अर्धशतक करण्याच्या विक्रमाची बरोबरी केली होती.