IPL 2024 Mumbai Indians : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ पूर्वी हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या अडचणी वाढू शकतात. संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) हर्नियाच्या शस्त्रक्रियेनंतर तंदुरूस्तीसाठी मेहनत घेतोय. पण, तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. IPL 2024 मधील मुंबई इंडियन्सच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी तो वेळेत तंदुरुस्त होणार नसल्याचे वृत्त समोर येत आहे.
सूर्यकुमार सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये ( NCA ) पुनर्वसन करत आहे. जानेवारीत त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही त्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. अशा स्थितीत त्याच्या घोट्यावर शस्त्रक्रिया झाल्याचे बोलले जात होते, परंतु दोन दिवसांपूर्वी सूर्याने स्वतः हर्नियाची शस्त्रक्रिया झाल्याचे सांगितले.
मुंबईला आयपीएल २०२४ मध्ये पहिला सामना २४ मार्च रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध खेळायचा आहे. यामध्ये खेळण्यासाठी सूर्या खूप मेहनत घेत आहे, परंतु त्याचे खेळणे अनिश्चित आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने सूर्याच्या फिटनेसबाबत तो आयपीएलमध्ये खेळणार असल्याचे वृत्त दिले आहे. पण पुनरागमन कधी होईल हे सांगणे कठीण आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, ''सूर्याचे पुनर्वसन मार्गावर असून तो आयपीएलमध्ये नक्कीच खेळेल. मात्र, एनसीएचे स्पोर्ट्स सायन्स आणि मेडिकल टीम त्याला पहिल्या दोन सामन्यात खेळण्याची परवानगी देईल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.''
गुजरातनंतर दुसऱ्या सामन्यात मुंबईला २७ मार्चला सनरायझर्स हैदराबादचा सामना करायचा आहे. सूत्राच्या हवाल्याने पीटीआयने सांगितले की, ''मुंबई इंडियन्सच्या पहिल्या सामन्याला अजून १२ दिवस बाकी आहेत. पण, सूर्याला पहिल्या सामन्यासाठी तंदुरुस्त होण्यासाठी वेळेशी झगडावे लागेल.''