Jasprit Bumrah Nitish Rana, IPL 2022 MI vs KKR: कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज नितीश राणा आणि मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या दोघांना IPL व्यवस्थापनाने दणका दिला. आयपीएल आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. नितीश राणाला सामन्याच्या मानधनातील १० टक्के रक्कम त्यांना दंड म्हणून ठोठावण्यात आली. तर जसप्रीत बुमराहला त्याच्या वर्तणुकीबाबत समज देण्यात आली. दोन्ही क्रिकेटपटू बुधवारी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवरील सामन्यात खेळत होते. त्यावेळी या दोघांनी केलेल्या वर्तणुकीमुळे त्यांच्यावर ही कारवाई केल्याचं बोललं जात आहे.
"कोलकाता नाईट रायडर्सच्या नितीश राणाला आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल फटकारले गेले आहे आणि त्याच्या सामन्याच्या मानधनाच्या १० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. राणाने आयपीएल आचारसंहितेच्या लेव्हल 1 गुन्ह्याची कबुली दिली असून शिक्षा मान्य केली आहे", असं IPLच्या अधिकृत पत्रकात नमूद केलं आहे. “मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराहलादेखील आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल फटकारण्यात आले आहे आणि समज देण्यात आली आहे. बुमराहने आयपीएल आचारसंहितेच्या लेव्हल 1 गुन्ह्याची कबुली दिली आहे.", असेही प्रसिद्धीपत्रकात लिहिले आहे.
दरम्यान, मुंबई इंडियन्स विरूद्धच्या सामन्यात कोलकाताने दमदार विजय मिळवला. १७२ धावांचा पाठलाग करताना कोलकाता संघ १४व्या षटकापर्यंत सामन्यात मागे होता. पण १५ आणि १६व्या षटकात पॅट कमिन्सने तुफानी फलंदाजी केली. त्याने १४ चेंडूत अर्धशतक ठोकत सर्वात जलद अर्धशतकाच्या विक्रमाची बरोबरी केली. त्याने नाबाद ५६ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. डॅनियल सॅम्सच्या एका षटकात त्याने तब्बल ३५ धावा दिल्या. त्याच षटकात सामना संपला.