वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे आणि पाठोपाठ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. पण, या दोन्ही मालिकेला भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) मुकणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेतील बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिकचा पाय मुरगळला होता आणि त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. दुखापतीतून सावरूनच हार्दिकने पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते आणि हार्दिक २.० पाहून सर्व अचंबित झाले होते. पण, आता पुन्हा त्याच्या करिअरला दुखापतीमुळे ब्रेक लागला आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिकने स्वत:च्या गोलंदाजीवर फलंदाजाने मारलेला फटका थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा तोल सुटला व उजवा पाय मुरगळला. त्यामुळे त्याला घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्धची आगामी ट्वेंटी-२० मालिका (IND vs AUS) आणि दक्षिण आफ्रिकेतील तीन ट्वेंटी-२० व ३ वन डे सामन्यांच्या मालिकेतून (IND vs SA) बाहेर बसावे लागणार आहे. हार्दिकची दुखापत ही भारतासाठी मोठा धक्का आहे. कारण, फलंदाजी व गोलंदाजीत त्याचे महत्त्वाचे योगदान आहे.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या तयारीत बाधा...हार्दिक पांड्याची दुखापत ही भारताच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीत मोठा अडथळा निर्माण करणारी ठरू शकते. रोहित शर्मा व विराट कोहली हे अनुभवी खेळाडू ट्वेंटी-२० क्रिकेटपासून दूर आहेत आणि त्यांचे वय पाहता २०२४चा वर्ल्ड कप ते खेळतील याची शक्यता कमी आहे. अशात बीसीसीआय हार्दिककडे ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार म्हणून पाहतेय... पण, त्यासाठीच्या तयारीच्या ट्वेंटी-२० मालिकेतच हार्दिकला मुकावे लागल्याने संघ व्यवस्थापनाची चिंता वाढलेली आहे.
हार्दिक बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपचार घेण्यासाठी दाखल होणार आहे.