Join us  

टीम इंडियाला मोठा धक्का; केएल राहुल उपचारासाठी लंडनला पोहोचला, जसप्रीत बुमराहचं काय?

5th Test, IND vs ENG: मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना धर्मशाला येथे ७ मार्च ते ११ मार्च दरम्यान खेळवला जाणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 11:52 AM

Open in App

5th Test, IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे, ज्यामध्ये भारतीय संघ सध्या ३-१ ने अजिंक्य आघाडीवर आहे. आता या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना धर्मशाला येथे ७ मार्च ते ११ मार्च दरम्यान खेळवला जाणार आहे.

हैदराबादमधील पहिल्या कसोटीपासून केएल राहुल संघाबाहेर आहे. केएल राहुल धर्मशाला कसोटीत खेळणार की नाही हे अजूनही निश्चित नाही. त्याचबरोबर भारतीय क्रिकेट संघाचे व्यवस्थापनही अनेक खेळाडूंना शेवटच्या कसोटीत विश्रांती देऊ शकते. बुमराहच्या पुनरागमनाचे अपडेटही समोर आले आहे.

'क्रिकबझ' मधील वृत्तात दावा करण्यात आला आहे की, केएल राहुलला उपचारासाठी परदेशात पाठवण्यात आले असून त्याच्यावर जवळपास एक आठवडा उपचार सुरू आहेत. तसेच केएल राहुल लंडनमधील तज्ञाचा सल्ला घेत असतील. राजकोटमधील तिसऱ्या कसोटीसाठी राहुलला ९० टक्के तंदुरुस्त मानले जात होते, परंतु तो पूर्णपणे बरा झालेला नाही, त्यामुळे BCCI आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) च्या व्यवस्थापनाने त्याच्या परिस्थितीचे पुनर्मूल्यांकन केले, त्यानंतरच त्याच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती मिळत आहे. 

संघातील केएल राहुलचे महत्त्व आणि त्याची दुहेरी भूमिका लक्षात घेता, बीसीसीआय, निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापन त्याच्यासोबत कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. मात्र, या अहवालात राहुल केव्हा पुनरागमन करणार याबाबत काहीही स्पष्ट झालेले नाही. बीसीसीआयच्या सूत्रांनी राहुल लंडनहून 'क्रिकबझ'वर परतण्याच्या तारखेला दुजोरा दिलेला नाही.

धर्मशाला कसोटीत कोण खेळणार? 

धर्मशाला कसोटीत कोण खेळणार आणि कोण नाही यावरून सध्या अनिश्चिततेचे वातावरण आहे. कारण बीसीसीआय, राष्ट्रीय निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापन या मालिकेतील शेवटच्या सामन्यासाठी आणखी काही खेळाडूंना विश्रांती देण्याचा विचार करत आहेत. ७ मार्चपासून सामना सुरू होत आहे. जसप्रीत बुमराहला रांची कसोटीसाठी वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत विश्रांती देण्यात आली होती, तो आता धर्मशाला सामन्यासाठी परतणार आहे हे निश्चित आहे. त्याचवेळी, काही खेळाडूंच्या वर्कलोड मॅनेजमेंटचा विचार करून, त्यांना विश्रांती देण्याची चर्चा सुरू आहे, ज्यामध्ये एक फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही विश्रांती मिळेल. मंगळवारी चौथ्या कसोटीनंतर रांचीहून रवाना झालेल्या भारतीय खेळाडूंना २ मार्च रोजी चंदीगडमध्ये एकत्र येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाहुण्या संघातील खेळाडूंसह भारतीय खेळाडू ३ मार्च रोजी चार्टर्ड फ्लाइटने धर्मशाला येथे जातील.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडबीसीसीआयजसप्रित बुमराहलोकेश राहुल