KL Rahul tested Covid positive: भारताचा स्टार फलंदाज आणि दमदार सलामीवीर लोकेश राहुल याला कोरोनाची लागण झाल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( BCCI ) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्वत: या वृत्ताला दुजोरा दिला. बोर्डाच्या आजच्या बैठकीनंतर गांगुलीने पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्याने, भारताचा वरिष्ठ फलंदाज केएल राहुलची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती दिली. सौरव गांगुलीने असेही सांगितले की भारताच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिला संघातील एका सदस्याला देखील कोविडची लागण झाली असून ती खेळाडू वैद्यकीय निरीक्षणाखाली आहे.
केएल राहुलच्या दुखापतीनंतर तो जर्मनीमध्ये शस्त्रक्रिया करण्यासाठी गेला. तेथील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्यानंतर राहुल वेस्ट इंडिज मालिकेसाठी भारतीय संघात परतला. पण आधी दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या राहुलला आता कोविडने विळखा घातला. त्यामुळे वेस्ट इंडिज मालिकेतील सुरूवातीच्या टप्प्यातील सामन्यांसाठी तो मुकण्याची दाट शक्यता आहे.
वेस्ट इंडिज दौऱ्यात भारतीय संघ तीन वन डे आणि पाच टी२० सामने खेळणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या दरम्यान शेवटचे दोन टी२० सामने अमेरिकेतील फ्लोरिडा येथे खेळवण्यात येणार आहेत. भारत-विंडिज दौऱ्याची सुरुवात पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल येथे २२ जुलै रोजी वन डे मालिकेने होईल. त्यातील उर्वरित दोन वन डे (२४ आणि २७ जुलै) याच मैदानावर होतील. त्यानंतर पाच टी२० आंतरराष्ट्रीय सामने तीन वेगवेगळ्या ठिकाणी खेळवले जातील. २९ जुलैची टी२० ब्रायन लारा क्रिकेट अकादमी (पोर्ट ऑफ स्पेन) येथे खेळवण्याच येणार आहे. दुसरी आणि तिसरी टी२० वॉर्नर पार्कवर होणार आहे. तर ६ आणि ७ ऑगस्टचे सामने लॉडरहिल (फ्लोरिडा) येथे खेळले जातील.
असा असेल भारताचा वेस्ट इंडिज दौरा-
२२ जुलै - पहिली वन डे - पोर्ट ऑफ स्पेन२४ जुलै - दुसरी वन डे - पोर्ट ऑफ स्पेन२७ जुलै - तिसरी वन डे - पोर्ट ऑफ स्पेन(सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता)
२९ जुलै - पहिली टी२० - पोर्ट ऑफ स्पेन१ ऑगस्ट - दुसरी टी२० - सेंट किट्स आणि नेव्हिस२ ऑगस्ट - तिसरी टी२० - सेंट किट्स आणि नेव्हिस६ ऑगस्ट - चौथी टी२० - फ्लोरिडा७ ऑगस्ट - पाचवी टी२० - फ्लोरिडा(सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता)
भारत-विंडिज मालिकेची आणखी एक गोष्ट म्हणजे, वेस्ट इंडिजचा संघ नवा कर्णधार निकोलस पूरन याच्या मार्गदर्शनाखाली मैदानात उतरणार आहे.