Wriddhiman Saha vs BCCI, IND vs SL : श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी संघात स्थान न मिळाल्याने भारताचा अनुभवी यष्टीरक्षक वृद्धिमान साहा काही दिवसांपासून वादात सापडला आहे. मुलाखत न दिल्याबद्दल पत्रकाराने दिलेली धमकी असो किंवा संघात निवड न झाल्यामुळे साहाने केलेली काही खळबळजनक विधानं असोत, गेल्या अनेक दिवसांपासून तो भारतीय क्रिकेटमधील एक वादग्रस्त चेहरा म्हणून प्रकाशझोतात आहे. एकीकडे वृद्धिमान साहाला आजीमाजी क्रिकेटपटूंचा पाठिंबा मिळत असतानाच दुसरीकडे त्याच्या अडचणीत अजूनच वाढ होण्याची चिन्हे आहेत. कारण वृद्धिमान साहा हा संघात नसला तरी तो BCCIशी वार्षिक कराराअंतर्गत करारबद्ध आहे. त्यामुळे या कराराच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपांवरून आता BCCI साहाला प्रश्न विचारणार असल्याचं बोललं जात आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार, वार्षिक कराराशी संबंधित खेळाडूंना संघ निवडीपासून ते इतर अनेक गोपनीय गोष्टी या सार्वजनिक स्तरावर बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. पण श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी संघात निवड न झाल्यानंतर वृद्धिमान साहाने प्रशिक्षक राहुल द्रविड आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यासोबत झालेलं संभाषण उघडपणे सार्वजनिक केलं. त्यामुळे हा वाद आणखीन चिघळला असं BCCI चं म्हणणं असल्याची चर्चा आहे. त्यामुळे केंद्रीय कराराच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी साहाला काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत.
नियम ६.३ चे उल्लंघन
वार्षिक करारातील ब गटात करारबद्ध असलेल्या साहाने नियम ६.३ चे उल्लंघन केल्याचे सांगितले जात आहे. या नियमानुसार, कोणत्याही खेळाडूने खेळ, अधिकारी, खेळातील घडामोडी, तंत्रज्ञानाचा वापर, संघनिवडीच्या गोष्टी किंवा खेळाशी संबंधित इतर कोणत्याही विषयांबद्दल काहीही मीडियासमोर किंवा सार्वजनिक स्तरावर बोलू नये. मात्र, साहाने काही गोष्टी थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून सार्वजनिक केल्यामुळे त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.