भारतीय संघाचा स्टार खेळाडू रिषभ पंत याच्यावर आता पुढील उपचार मुंबईत केले जाणार आहेत. ३० डिसेंबरला रिषभ कार अपघातात गंभीर जखमी झाला होता आणि त्याच्यावर देहराडून येथे उपचार सुरू आहेत. रुरकीजवळ कार अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. मात्र आता दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने (डीडीसीए) मोठा निर्णय घेतला आहे. DDCA पंतला उपचारासाठी मुंबईला घेऊन जाणार आहे. त्याचवेळी त्याच्या लिगामेंटच्या दुखापतीवर उपचार केले जातील.
काय म्हणाले DDCA चे संचालक?
डीडीसीएचे संचालक श्याम शर्मा म्हणाले, क्रिकेटपटू रिषभ पंतला पुढील उपचारांसाठी आज मुंबईला हलवण्यात येणार आहे. ३० डिसेंबर रोजी झालेल्या कार अपघातानंतर पंत यांच्यावर डेहराडूनमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दुखापतीबाबत बीसीसीआयने काय अपडेट दिले?
पंतच्या डोक्यात दोन कट असल्याची माहिती बीसीसीआयने दिली होती. त्याच्या उजव्या गुडघ्यातील लिगामेंट फाटले असून उजव्या हाताच्या मनगटावर, घोट्याला, पायाच्या बोटाला दुखापत झाली आहे. तसेच, त्याच्या पाठीवर घर्षणाची जखम आहे. पंतची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे, मात्र आता बीसीसीआय आणि डीडीसीएने त्याच्यावर चांगले उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी वन डे वर्ल्ड कप स्पर्धा पाहता बीसीसीआयला पंतला लवकरात लवकर तंदुरुस्त पाहायचे आहे.
रुरकीजवळ रिषभची कार दुभाजकाला धडकून उलटली. अपघातानंतर कारने पेट घेतला आणि कार पूर्णपणे जळून खाक झाली. कारची काच फोडून पंत स्वतः बाहेर पडला आणि त्यानंतर उपस्थित लोकांनी त्याला रुग्णालयात नेले. पंत दिल्लीहून उत्तराखंडमधील आपल्या घरी परतत होते. रुरकीच्या नरसन सीमेवर हम्मादपूर झालजवळ त्यांच्या कारला अपघात झाला.
IPL 2023 मध्ये खेळण्याबाबत शंका
बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका खेळल्यानंतर पंत दुबईला पोहोचला होता. तेथून ते २९ डिसेंबरला दिल्लीला आला आणि तेथून खासगी कारने रुरकी येथील त्याच्या घरी जात होता. श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० आणि वन डे मालिकेसाठी पंतचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. आता दुखापतीनंतर पंतच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका आणि आयपीएल २०२३ मध्ये खेळण्यावर साशंकता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतला पूर्णपणे बरे होण्यासाठी चार ते सहा महिने लागू शकतात.
Web Title: Big Breaking: BCCI to shift Rishabh Pant from Dehradun to Mumbai; know why
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.