न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे सुरु आहे. या सामन्यात मार्नस लॅबुश्चॅग्नेनं आणखी एक शतकी खेळी करताना ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत आणले आहे. डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांनीही प्रत्येकी 43 धावांची खेळी करताना संघाच्या धावसंख्येत हारभार लावला. पण, हा सामना सुरू असताना एक विपरित गोष्ट घडल्याचे समोर आले आहे. पर्थ स्टेडियमच्या बाजूलाच असलेल्या बेलमोंट रेस कोर्सवर अचानक आग लागली आणि त्याच्या धुराचा लोट स्टेडियमभवती पसरला. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये भितीचं वातावरण पसरलं होतं.
ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वॉर्नर आणि जो बर्न्स यांना साजेशी सुरुवात करून देता आली नाही. बर्न्स 9 धावांवर कॉलीन डी ग्रँडहोमच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्यानंतर वॉर्नर व लॅबुश्चॅग्ने या जोडीनं डाव सावरण्याचा प्रयत्न केला. वॉर्नर 74 चेंडूंत 4 चौकार लगावताना 43 धावांत माघारी परतला. नील वॅगनरनं स्वतःच्याच गोलंदाजीवर वॉर्नरला झेलबाद केले. लॅबुश्चॅग्नेनं तिसऱ्या विकेटसाठी स्टीव्ह स्मिथसह शतकी भागीदारी केली. वॅगनरनं ही जोडी फोडली. त्यानं स्मिथला 43 धावांवर माघारी पाठवले.