Ruturaj Gaikwad ruled out, IND vs SL T20 : भारताचा मराठमोळा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याला दुखापतीमुळे श्रीलंकेविरूद्धच्या टी२० मालिकेतून बाहेर व्हावे लागले आहे. तो पहिल्या सामन्यात खेळणार हे जवळपास निश्चित होतं पण त्याला दुखापत झाल्याने तो पहिली टी२० खेळू शकला नाही. त्यातच आता त्याला एकही न सामना खेळता मालिकेतून माघार घ्यावी लागल्याने हा भारतीय संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे. पहिल्या सामन्यातही ऋतराज नसल्याने कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी सलामी केली होती.
ऋतुराज गायकवाड टी२० मालिकेतून बाहेर झालं असल्याची माहिती BCCIने ट्वीट करत दिली. ऋतुराजच्या उजव्या मनगटात वेदना होत असल्याचं त्याने लखनौ येथील पहिल्या टी२० सामन्याआधीच सांगितलं होतं. त्यावेळी त्याची वैद्यकीय चाचणी BCCI च्या मेडिकल टीमने केली. त्याच्या मनगटाचा MRI स्कॅनही काढण्यात आला. स्पेशालिस्ट डॉक्टरांकडून त्याच्याबाबत सल्ला घेण्यात आल्यावर तो टी२० मालिकेत खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं. या दुखापतीनंतर आता ऋतुराज काही दिवसांसाठी बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये दाखल होणार आहे. त्याच्या दुखापतीवर पुढील उपचार तेथेच केले जाणार असून त्या दृष्टीने त्याचे तिथेच काही दिवस वास्तव्य असेल.
ऋतुराज गायकवाडच्या जागी भारतीय संघाच्या निवड समितीने मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) याला बदली खेळाडू म्हणून संघात दाखल करून घेतलं आहे. आगामी २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत मयंकचा समावेश होता. त्यामुळे तो टीम इंडियाच्या बायो-बबलमध्येच होता. मयंक धर्मशाला येथे जाऊन भारताच्या टी२० संघात दाखल झाला आहे.
दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यासाठी भारताचा टी२० संघ - रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, इशान किशन (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, रवींद्र जाडेजा, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान, मयंक अग्रवाल