ICC ODI World Cup 2023 : भारत आणि पाकिस्तान ( India vs Pakistan) यांच्यातील वर्ल्ड कप २०२३ सामन्याची तारीख बदलली गेली आहे. हा सामना १४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. याबाबतची घोषणा आयसीसी आणि बीसीसीआयकडून लवकरच केली जाणार आहे. यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकात हा सामना १५ ऑक्टोबरला होणार होता. हा सामना अहमदाबादमध्येच होणार आहे. भारत-पाकिस्तान सामन्याव्यतिरिक्त वर्ल्ड कप २०२३ च्या वेळापत्रकात आणखी काही बदल केले जाणार आहेत. याबाबतची अधिकृत माहिती ३१ जुलै रोजी दिली जाणार आहे.
सुरक्षा यंत्रणांनी बीसीसीआयला पाठवलेल्या अहवालात भारत-पाकिस्तान सामना १५ ऑक्टोबरऐवजी अन्य तारखेला व्हावा, असे म्हटले होते. १५ ऑक्टोबरपासून नवरात्र सुरू होत आहेत. या दरम्यान गुजरातमध्ये रात्री गरब्याचे कार्यक्रम होतात आणि त्यात मोठी गर्दी जमते. यामुळे सुरक्षा व्यवस्था सांभाळणे कठीण काम होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची प्रेक्षक क्षमता एक लाखाच्या वर आहे. भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान ती पूर्णपणे भरून निघण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी हा सामना नवरात्री सुरू होण्यापूर्वी आयोजित करण्याची शिफारस केली होती.
भारत-पाकिस्तान सामन्याशिवाय आणखी तीन देशांनीही त्यांच्या वेळापत्रकातील बदलाबाबत बीसीसीआयला सांगितले होते. या अंतर्गतही बदल करावे लागतील. ज्या संघांच्या सामन्यांमध्ये सहा-सात दिवसांचा फरक आहे ते कमी केले जातील, असे सांगण्यात आले.