मुंबई - भारतीय क्रिकेट चाहत्यांना महिला क्रिकेटच्या प्रेमात पाडणाऱ्या, महिला क्रिकेटपटूंच्या हक्कासाठी वेळप्रसंगी भांडणाऱ्या आणि भारताच्या महिला क्रिकेट संघाला वेगळी उंची गाठून देणाऱ्या मिताली राजने ( Mithali Raj) बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये अनेक विक्रमांची नोंद करणाऱ्या मिताली राज हिने वयाच्या ३९ व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली. या संदर्भात सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये मितालीने लिहिले की, मी अगदी लहान मुलगी होते तेव्हा मी निळी जर्सी परिधान करून आपल्या देशाचं प्रतिनिधित्व केलं होतं. हा प्रवास खूप मोठा होता. या काळात विविध प्रकारचे क्षण मला अनुभवायला, पाहायला मिळाले. गेली २३ वर्षे माझ्या जीवनातील सर्वात उत्तम क्षणांपैका होती. प्रत्येक प्रवासाप्रमाणे हा प्रवासही आता थांबत आहे. आज मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व प्रकारांमधून निवृत्तीची घोषणा करत आहे.
मिताली राज हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर बीसीसीआयनेही ट्वीट करत तिच्या कारकिर्दीला अभिवादन केलं आहे. तुझं भारतीय क्रिकेटमधील योगदान हे अप्रतिम आहे. तुझ्या दैदीप्यमान कारकीर्दीसाठी तुझं अभिनंदन. तू क्रिकेमध्ये समृद्ध वारसा मागे ठेवला आहेस, असं बीसीसीआयनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मिताली राज हिने १२ कसोटी २३२ एकदिवसीय आणि ८९ टी-२० सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यापैकी १२ कसोटी सामन्यात १ शतक आणि ४ अर्धशतकांच्या मदतीने तिने ६९९ धावा फटकावल्या. त्यामध्ये २१४ ही तिची सर्वोच्च धावसंख्या होती. तर २३२ एकदिवसीय सामन्यांमध्ये मितालीने तब्बल ५०.६८ च्या सरासरीने ७ हजार ८०५ धावा काढल्या आहेत. त्यामध्ये ७ शतके आणि ६४ अर्धशतकांचा समावेश आहे. तर टी-२० क्रिकेटमध्येही मितालीने चमक दाखवली. तिने ८९ टी-२० सामन्यात ३७.५२ च्या सरासरीने २ हजार ३६४ धावा जमवल्या. त्यामध्ये १७ अर्धशतकांचा समावेश आहे.