नवी दिल्ली : धडाकेबाज फलंदाज एबी डी'व्हिलियर्स काही मिनिटांपूर्वीच क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेत क्रिकेट जगताला मोठा धक्का दिला. पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकापूर्वी डी'व्हिलियर्सने हा निर्णय घेतल्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघालाही हा मोठा धक्का असेल. डी'व्हिलियर्सने ट्विटरच्या माध्यमातून ही गोष्ट साऱ्यांना सांगितली आहे. ट्विटरवर डी'व्हिलियर्सने एक व्हीडीओ पोस्ट केला आणि त्यामध्ये त्याने आपण क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेत असल्याचे त्याने जाहीर केले.
डी'व्हिलियर्सने आतापर्यंत 114 कसोटी आणि 228 एकदिवसीय सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधीत्व केले होते, त्याचबरोबर 78 ट्वेन्टी-20 सामन्यांमध्ये त्याने देशाचे प्रतिनिधीत्व केले होते. डी'व्हिलियर्सच्या नावावर सर्वात जलद अर्धशतक (16 चेंडू), शतक (31 चेंडू), दीडशतक (64 चेंडू) फटकावण्याचे विश्वविक्रम आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याची नाबाद 278 धावांची खेळी चांगलीच गाजली होती.
" सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती पत्करण्याचा निर्णय घेणे माझ्यासाठी सोपे नव्हते. पण निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे, असे मला वाटले. आतापर्यंत मला ज्या सहकाऱ्यांनी पाठिंबा दिला त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो, " असे डी'व्हिलियर्सने सांगितले.
डी'व्हिलियर्सने कसोटी क्रिकेटमध्ये 50.66 च्या सरासरीने 8765 धावा केल्या, यामध्ये 22 शतकांचा समावेश होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 53.50च्या सरासरीने 9577 धावा केल्या होत्या.