India vs England 3rd Test Day 4 : कौटुंबिक कारणामुळे तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी अचानक माघार घेणारा आर अश्विन ( R Ashwin ) राजकोटच्या दिशेने रवाना झाला आहे. भारतीय संघासाठी व चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी ब्रॉडकास्टरशी बोलताना कुलदीप यादव म्हणाला, ''खात्री नाही पण मला वाटते की अश्विन भाई कदाचित परत येत असेल.”
दिनेश कार्तिकनेही समालोचन करताना सांगितले की, अश्विन आता परत आला तर गोलंदाजी करू शकतो आणि ही भारतीय संघासाठी खूप मोठी गोष्ट आहे. बीसीसीआयनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अश्विन आणि संघ व्यवस्थापनला हे सांगण्यात आनंद होतोय की अश्विन तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी खेळणार आहे, असे बीसीसीआयने सांगितले. अश्विन लंच ब्रेकपर्यंत राजकोट येथे दाखल होणार आहे.
कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ५०० विकेट्स पूर्ण करून इतिहास रचणारा आर अश्विन तातडीने घरी परतला होता. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या आईची प्रकृती बिघडली होती आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखळ करावे लागले होते.
अश्विनच्या माघारीमुळे भारताला तिसऱ्या दिवशी १० खेळाडू व १ बदली खेळाडूसह खेळावे लागले होते. कर्णधार रोहित शर्माने त्याला रिप्लेसमेंट खेळाडू न खेळवता देवदत्त पडिक्कलला राखीव खेळाडू म्हणून मैदानावर खेळवले आणि त्यामुळेच आता आर अश्विन थेट प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार आहे.