रोहित शर्माचे ( Rohit Sharma) दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील कसोटी मालिकेत खेळणे संकटात सापडले आहे. आफ्रिका दौऱ्यासाठी निवडलेल्या कसोटी संघातील सर्व खेळाडू मुंबईत दाखल झाले आहेत आणि आजपासून ते तीन दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये राहणार आहेत. पण, याआधी त्यापैकी काही खेळाडूंनी कसून सराव केला. सराव सत्रादरम्यान रोहितला दुखापत झाली आणि त्यामुळेच त्याचे आता दौऱ्यावर जाणे अनिश्चिततेच्या छायेत आहे. बीसीसीआयनं गुजरातचा फलंदाज प्रियांक पांचाळ ( Priyank Panchal) याला आफ्रिका दौऱ्यासाठी तयार राहण्यास सांगितले आहे.
रोहितची अनुपस्थिती भारतीय संघासाठी मोठा धक्का असणार आहे. २०२१मध्ये कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसंच नुकतीच त्याची कसोटी संघाचा उप कर्णधार म्हणून निवड केली गेली आहे. रोहितनं माघार घेतल्यात हे पद पुन्हा अजिंक्य रहाणेकडे जाईल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे किंवा अन्य खेळाडूची उप कर्णधार म्हणून घोषणा होऊ शकते. २०१९च्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकपासून रोहितचे कसोटीत सलामीला प्रमोशन झाले. त्यानंतर त्यानं १६ कसोटीत ५८.४८च्या सरासरीनं १४६२ धावा केल्या आहेत. त्यात पाच शतकांचा समावेश आहे.
पांचाळला यापूर्वीही इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघासोबत नेले होते. ३१ वर्षीय पांचाळ स्थानिक क्रिकेटमध्ये गुजरात संघाचे नेतृत्व सांभाळतो आणि इंग्लंड दौऱ्यावर अभिमन्यू इस्वरन याच्यासह तो राखीव खेळाडू म्हणून टीम इंडियासोबत होता. मागील काही वर्षांपासून तो भारत अ संघाचा नियमित सदस्य आहे. त्याच्याकडे १०० प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांचा अनुभव आहे. तो सध्या भारत अ संघासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे आणि तेथे त्यानं ९६, २४ व ० अशी तीन डावांत खेळी केली आहे.
रणजी करंडक २०१६-१७च्या पर्वात पांचाळनं १७ डावांत ८७.३३च्या सरासरीनं १३१० धावा केल्या होत्या. त्याच पर्वात त्यानं पंजाबविरुद्ध नाबाद ३१४ धावांची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी केली होती. गुजरातनं तेव्हा जेतेपदही जिंकले होते.