भारतात सध्या आयपीएलचे वारे वाहत असले तरी जून महिन्याच्या सुरुवातीला होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेकडेही टीम इंडियाची नजर आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताची गाठ ऑस्ट्रेलियाशी पडणार आहे. हा सामना ७ ते ११ जून या दरम्यान, लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाची निवड लवकरच होणार असून, त्यात भारतीय संघामध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.
प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तानुसार जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा ही मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या संघात कुणाकुणाला स्थान मिळणार आणि कुणाचा पत्ता कट होणार याबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी ज्या खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळू शकतं, अशा खेळाडूंची यादी पुढीलप्रमाणे आहे.
या सामन्यासाठी भारतीय संघाचं नेतृत्व रोहित शर्माच्या हातात असेल. तर शुभमन गिल आणि के.एल. राहुल यांचा रोहित शर्मासोबत सलामीवीर म्हणून संघात समावेश असेल. चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांच्यावर मधल्या फळीची जबाबदारी असेल. तर श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त असल्याने तो उपलब्ध नाही आहे. अशा परिस्थितीत अनुभवी फलंदाज अझिंक्य रहाणे याला निवड समिती संधी देऊ शकते. गतवर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर अजिंक्य रहाणेला संघातून वगळण्यात आलं होतं. मात्र आता आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करत त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
३४ वर्षीय अजिंक्य रहाणेने रणजी करंडक स्पर्धेमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. तसेच आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळताना अजिंक्य रहाणे एका पाठोपाठ एक स्फोटक खेळी करत आहे. तसेच इंग्लंडमधील वातावरणात खेळण्याचा अनुभवही रहाणेच्या गाठीशी आहे. एका रिपोर्टनुसार निवड समितीने रहाणेला आयपीएलदरम्यान, लाल चेंडूवर फलंदाजीचा सराव करण्याचाही सल्ला दिला आहे. त्यामुळे या संघात स्थान मिळवण्यासाठी अजिंक्य रहाणेची दावेदारी मजबूत दिसत आहे. अजिंक्य रहाणेला संघात स्थान मिळाल्यास मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवला संघातून वगळण्यात येण्याची शक्यता आहे. सूर्यकुमार यादवच्या गाठीशी कसोटी क्रिकेटचा पुरेसा अनुभव नाही आहे, ही बाबही त्याच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी संभाव्य १५ सदस्यीय संघरोहित शर्मा (कर्णधार), के.एल. राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, के.एस. भरत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट.