मुंबईच्या वानखेडेवर थोड्याच वेळाच वर्ल्डकपचा पहिला सेमीफायनलचा सामना खेळविला जाणार आहे. भारत आणि न्युझीलंडमध्ये फायनलमध्ये जाण्यासाठी चुरस रंगणार आहे. या सामन्यात पिच महत्वाची भूमिका बजावणार आहे. असे असताना पिचवरून बीसीसीआयवर आरोप होऊ लागले आहेत.
वानखेडे स्टेडिअमच्या पिचवरून मोठी बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार ज्या पिचला सेमीफायनलसाठी निवडले गेलेले त्याऐवजी दुसऱ्याच पिचवर मॅच खेलविली जाणार आहे. हे पिच भारतीय फिरकीपटूंना फायदा देणारे असेल असा आरोप केला जात आहे.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार आयसीसीचे पिच कन्सल्टंट अँडी एटकिंसन यांनी भारत-न्यूझीलंडच्या मॅचसाठी जे पिच निवडले होते ते यापूर्वी वर्ल्डकपसाठी कधीही वापरले गेले नव्हते. परंतू, आता दोन वर्ल्ड कप सामने खेळले गेलेले पिच निवडण्यात आले आहे.
भारतीय फिरकीपटूंना फायदा होण्यासाठी असे केल्याचा आरोप करण्यात आला आहे. खेळपट्टी बदलण्यासाठी व्हॉट्सअॅप मजकूर भारतीय आणि आयसीसी अधिकाऱ्यांना पाठवण्यात आला आहे. सामन्यात खेळपट्टी क्रमांक 7 ऐवजी 6 क्रमांकाची खेळपट्टी वापरली जाईल, असे संदेशात म्हटले होते. जे पिच या सामन्यासाठी निवडण्यात आले होते, त्यामध्ये काही समस्या असल्याचे पिच कन्सल्टंटला कळविण्यात आले आहे.