वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील भारतीय संघाची कामगिरी उल्लेखनीय झालेली आहे. भारताने सलग पाच विजयांची नोंद करताना १० गुणांसह उपांत्य फेरीतील स्थान पक्कं करण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. आता भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंडविरुद्ध खेळण्यापूर्वी पुरेशी विश्रांती मिळाली आहे. त्यामुळे खेळाडूंना २ दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. मात्र, संघ व्यवस्थापनाने खेळाडूंना ट्रेकिंगवर बंदी घातली आहे. खेळाडू धर्मशाला या नयनरम्य शहरात पर्यटनासाठी जाऊ शकतात, पण ट्रेकिंग करू शकत नाहीत.
भारतीय संघाने धर्मशाला येथे रविवारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडवर विजय मिळवला. आता त्यांचा पुढचा सामना २९ ऑक्टोबरला लखनौ येथे आहे. ७ दिवसांच्या विश्रांतीत संघ व्यवस्थापनाने खेळाडूंना दोन दिवसांची सुट्टी दिली आहे. लखनौला रवाना होण्यापूर्वी दिलेल्या या सुट्टीत भारतीय खेळाडूंना ट्रेकिंगला जाण्यास मनाई करण्यात आले आहे.
भारतीय संघ २५ ऑक्टोबरला लखनौसाठी रवाना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्याकडे धर्मशाला येथील नयनरम्य ठिकाणांना भेट देण्याची संधी आहे. “संघ व्यवस्थापनाने खेळाडूंना कळवले आहे, की ते ट्रेकिंगला जाऊ शकत नाहीत. ते बाहेर जाऊ शकतात पण ट्रेकिंग करू शकत नाहीत. त्याच वेळी मालिकेदरम्यान कोणताही भारतीय खेळाडू पॅराग्लायडिंग देखील करू शकत नाही कारण ते खेळाडूंच्या कराराच्या विरोधात जाऊ शकते, ”असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला सांगितले. संघ व्यवस्थापनाने सर्व खेळाडूंना कडक इशारा दिला आहे. धर्मशाला येथे ट्रेकिंग करण्यासाठी खेळाडू उत्साहात होते आणि त्यांना ट्रेक करायचा होता. मात्र, व्यवस्थापनाने कोणत्याही खेळाडूला विशेषत: वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान ट्रेकिंग करण्यास कडक बंदी घातली आहे. मोठी स्पर्धा सुरू असताना कोणत्याही खेळाडूला दुखापत होण्याची जोखीम घेण्यास बोर्ड आणि व्यवस्थापन तयार नाही. ट्रेकिंग न करण्यामागे खेळाडूंच्या सुरक्षेचाही मोठा घटक असल्याचे मानले जात आहे.