भारतीय क्रिकेटला मोठे करण्यासाठी बीसीसीआय कोणतीही कसर सोडत नाही आणि त्यात सातत्याने सुधारणा करत आहे. महिला प्रीमियर लीगची सुरुवात केली आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये मोठे बदल केले. बीसीसीआयचे सचिव जय शाह ( Jay Shah) यांनी आज मोठी घोषणा केली. BCCI ने देशांतर्गत स्पर्धांवरही पैशांचा वर्षाव केला आहे. देशांतर्गत क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी बीसीसीआयने बक्षीस रकमेत वाढ केली आहे. देशांतर्गत रणजी करंडक, इराणी, दुलीप करंडक, विजय हजारे करंडक, देवधर करंडक, सय्यद मुश्ताक अली करंडक, वरिष्ठ महिला वन डे करंडक, वरिष्ठ महिला ट्वेंटी-२० करंडक या स्पर्धांचा समावेश आहे.
विजय हजारे करंडक विजेत्याची बक्षीस रक्कम २० लाखांवरून १ कोटी आणि उपविजेत्याची बक्षीस रक्कम १५ लाखांवरून ५० लाख करण्यात आली आहे. देवधर ट्रॉफीच्या विजेत्याची बक्षीस रक्कम २५ लाखांवरून ४०लाख रुपये आणि उपविजेत्यांना १५ लाखांवरून २० लाख रुपये देण्यात येणार आहेत. सय्यद मुश्ताक अली करंडक विजेत्याची बक्षीस २५ लाखांवरून ८० लाख रुपये आणि उपविजेत्याचे बक्षीस १० लाखांवरून ४० लाख रुपये करण्यात आले आहे. वरिष्ठ महिला वन डे ट्रॉफी विजेत्याला आता ६ लाखांऐवजी ५०लाख आणि उपविजेत्याला ३ लाखांऐवजी २५ लाख मिळतील.