BCCIच्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आयपीएलच्या ( Indian Premier League) १३व्या पर्वात महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सला ( CSK) अपयशाचे तोंड पाहावे लागले. त्याचबरोबर अन्य संघांनाही मोठे धक्के बसले. त्यामुळे २०२१साठी नव्यानं लिलाव ( Auction) होण्याचीही चर्चा सुरू होती. तसेच पुढील वर्षी दोन नवीन संघही मैदानावर उतरणार असल्याची चर्चा आहे. BCCIच्या वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली आणि त्यात १० संघांसह आयपीएल खेळवण्याचा प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. पण, २०२१च्या नव्हे, तर २०२२च्या आयपीएलमध्ये दहा संघ एकमेकांशी भिडताना पाहायला मिळतील.
आयपीएलमध्ये दोन नव्या संघांसाठी अदानी ग्रुप आणि गोएंका हे शर्यतीत आहेत. अदानी ग्रुप व संजिव गोएंका ग्रुप आयपीएलचा नवा संघ खरेदी करण्यासाठी उत्सुक आहेत. यापैकी एक संघ हा अहमदाबादचा असेल आणि तो अदानी ग्रुप खरेदी करण्याची शक्यता अधिक आहे. दुसऱ्या संघासाठी कानपूर, लखनौ आणि पुणे यांच्या नावाची चर्चा आहे. संजिव गोएंका ग्रुपनं 2016 व 2017 च्या आयपीएलमध्या रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघ मैदानावर उतरवला होता आणि त्या संघाला अनुक्रमे सातव्या व दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. PTIनं दिलेल्या वृत्तानुसार २०२२च्या आयपीएलमध्ये दोन नव्या संघांच्या समावेशावर सर्व सदस्यांनी सकारात्मकता दर्शवली.