मुंबई - भारतीय क्रिकेटविश्वातून खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिक्रेटमधील यशस्वी कर्णधारांपैकी एक आणि विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी पदाचा राजीनामा Sourav Ganguly Resigns दिल्याची चर्चा त्यांच्या एका ट्विटमुळे सुरू झाली आहे. सौरव गांगुली यांनी ट्विट करत तसे संकेत दिले आहेत. तसेच आपण नवी इनिंग सुरू करत असून, त्यासाठी त्यांनी चाहत्यांकडे पाठिंब्याची मागणी केली आहे. आपण पुढे काय करणार याची माहिती गांगुली यांनी दिलेली नाही. मात्र ते राजकारणात उतरतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सौरव गांगुली यांनी या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये लिहिले की, १९९२ मध्ये मी क्रिकेटमधील माझा प्रवास सुरू केला होता. २०२२ मध्ये माझ्या क्रिकेट कारकिर्दीची ३० वर्षे पूर्ण होत आहेत. तेव्हापासून क्रिकेटने मला खूप काही दिले आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्रिकेटमुळे तुम्हा सर्वांचा पाठिंबा मला मिळाला आहे. मी प्रत्येक पाठीराख्याचे आभार मानतो.
आज मी एक अशी गोष्ट सुरू करण्याची योजना आखत आहे ज्यामुळे अनेक लोकांना फायदा होईल, अशी मला अपेक्षा आहे. माझ्या जीवनातील या नव्या अध्यायामध्ये तुमचा पाठिंबा मला मिळेल, अशी मला अपेक्षा आहे, असे सौरव गांगुली यांनी या संदेशामध्ये म्हटले आहे.