कोलकाता - बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. सौरव गांगुली हे कोलकातामधील वुडलँड रुग्णालयात दाखल आहेत.
सौरव गांगुली यांची कोरोना चाचणी सोमवारी रात्री पॉझिटिव्ह आली होती. रुग्णालयात दाखल होण्याची गांगुली यांची या वर्षातील ही दुसरी वेळ आहे. जानेवारी महिन्यात हृदयविकाराचा सौम्य धक्का आल्याने गांगुली यांना रुग्णालयात दाखल कऱण्यात आले होते. त्यानंतर त्यांची अँजिओप्लॅस्टी करण्यात आली होती. दरम्यान सध्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनचा फैलाव वाढत असल्याने चिंता वाढलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज सौरव गांगुली यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने क्रिकेटप्रेमी चिंतीत आहेत.
गेल्या काही दिवसांत भारतीय क्रिकेट संघामध्ये घडलेल्या काही घडामोडींमुळे सौरव गांगुली हे चर्चेत आहेत. भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी सौरव गांगुली यांनी विराट कोहलीच्या कर्णधारपदाबाबच एक विधान केले होते. त्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये वादळ आले होते. तसेच भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यामध्ये जोरदार वाकयुद्ध रंगले होते.