भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंडविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका खेळत आहे. सध्या संघाची धुरा सलामीवीर रोहित शर्माकडे आहे. त्याच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत विजय मिळवला. आता न्यूझीलंड विरुद्धही टीम इंडियानेही पहिल्याच वनडे सामन्यात 12 धावांनी विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा वनडे सामना 21 जानेवारीला खेळवला जाणार आहे. मात्र, यापूर्वीच रोहित शर्माच्या कर्णधारपदासंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे.
वनडे वर्ल्ड कप संपेपर्यंत रोहितच राहणार कर्णधार? -माध्यमांतील वृत्तांनुसार, दावा करण्यात येत आहे की, रोहित शर्मा आगामी आयसीसी एकदिवसीय विश्वचषक-2023 संपेपर्यंतच कर्णधारपदावर राहील. या जागतीक स्पर्धेत रोहित टीम इंडियाचे नेतृत्व करेल. तसेच या स्पर्धेसोबतच तो आपल्या कर्णधारपदाचा कार्यकाळही सपवेल. याशिवाय, नवनियुक्त उपकर्णधार हार्दिक पांड्याही पुढील वर्षी होणाऱ्या T20 विश्वचषकापर्यंत (2024) कर्णधारपदावर राहील.
हार्दिकला मिळू शकते जबाबदारी - बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने इनसाईड स्पोर्टने एका वृत्तात म्हटले आहे की, रोहित शर्मा या वर्षाच्या अखेरपर्यंतच वनडे संघाचे नेतृत्व करेल. याशिवाय, तो कसोटी संघाचे नेतृत्व करत राहील, अशी आस बीसीसीआयला आहे. मात्र, त्याच्या कसोटी कर्णधारपदासंदर्भातील निर्णय एकदिवसीय विश्वचषकानंतरच घेतला जाईल. यातच, केएल राहुल कसोटी संघाचे कर्णधारपद सांभाळण्याच्या शर्यतीत सर्वात पुढे आहे.