ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell ) याला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. मॅक्सवेलला कोणतीही दुखापत किंवा आजार नाही, परंतु एडिलेडमधील एका पबमध्ये पार्टी केल्यानंतर त्याला रुग्णालयात न्यावे लागले. मॅक्सवेलची प्रकृती एवढी बिघडली की त्याला रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये न्यावे लागले. मॅक्सवेल एका प्रसिद्ध गोल्फ स्पर्धेसाठी गेला होता. यानंतर तो त्या पबमध्ये गेला जिथे ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर ब्रेट लेचा बँड सिक्स अँड आउट सादर करत होता. यानंतर, मॅक्सवेलने पबमध्ये पार्टी केली आणि त्यानंतर त्याला रुग्णवाहिकेतून रॉयल अॅडलेड रुग्णालयात नेण्यात आले.
रिपोर्टनुसार, मॅक्सवेल रात्रभर हॉस्पिटलमध्ये होता आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-२० सामन्यासाठी तो सरावासाठी परतला आहे. मात्र संपूर्ण सत्य अद्याप समोर आलेले नाही. मॅक्सवेलला कोणत्या अवस्थेत रुग्णालयात दाखल करावे लागले याची माहिती सध्यातरी मिळालेली नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियालाही मॅक्सवेलच्या या वृत्ताची माहिती आहे. मॅक्सवेलला वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी मॅक्सवेल आणि झाय रिचर्डसन यांना संघातून वगळण्यात आल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आधीच स्पष्ट केले असून त्यांच्या जागी बीबीएल स्टार जेक फ्रेझर आणि झेवियर बार्टलेटला संघात स्थान देण्यात आले आहे.