इंग्लंडला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेपूर्वी मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्स ( Ben Stokes ) जून महिन्यात होणाऱ्या ICC T20 World Cup 2024 स्पर्धेत सहभागी होणार नाही. बेन स्टोक्सने सांगितले की, वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे जूनमध्ये होणाऱ्या या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी माझ्या नावाच विचार करू नये.
भविष्यात सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये गोलंदाजी करता यावी आणि यासाठी पूर्ण तंदुरुस्ती राखता यावी, यासाठी इंग्लंडच्या कसोटी संघाच्या कर्णधाराने हा निर्णय घेतला आहे. त्याला आगामी वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्धच्या अनुक्रमे २ व ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी गोलंदाजी करण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त व्हायचे आहे. स्टोक्स म्हणाला, “मी कठोर परिश्रम करत आहे. क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये अष्टपैलू म्हणून भूमिका पार पाडण्यासाठी माझा बॉलिंग फिटनेस बॅकअप करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. आयपीएल आणि वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे, मला आशा आहे की नजीकच्या भविष्यासाठी मला अष्टपैलू म्हणून खेळता येईल.''
“माझ्या गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर आणि ९ महिने गोलंदाजी न केल्यानंतर मी गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून किती मागे होतो, हे मला भारताविरुद्धच्या अलीकडील कसोटी दौऱ्यातून समजले. आमचा कसोटी हंगाम सुरू होण्यापूर्वी मी कौंटी चॅम्पियनशिपमध्ये डरहॅमकडून खेळण्यास उत्सुक आहे. जॉस, माँटी आणि सर्व संघाला मी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जेतेपद कायम राखण्यासाठी शूभेच्छा देतो,''असेही स्टोक्स म्हणाला.
इंग्लंडचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेतील प्रवास ४ जूनपासून स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्याने सुरू होईल. त्यानंतर ते सुपर ८ आणि बाद फेरीसाठी पात्र होण्यापूर्वी बार्बाडोस आणि अँटिग्वा येथे ऑस्ट्रेलिया, ओमान आणि नामिबियाविरुद्ध साखळी सामने खेळतील. बेन स्टोक्सने ४३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यांत ५८५ धावा केल्या आहेत आणि २६ विकेट्स घेतल्या आहेत.