KKR Captain: IPL 2023 सुरू होण्यासाठी अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत. 31 मार्चला गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांमध्ये या हंगामाचा सलामीचा सामना रंगणार आहे. यंदाच्या IPL आधी अनेक संघांना खेळाडूंच्या दुखापतींचा फटका बसल्याचे दिसत आहे. मुंबई इंडियन्स स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या जायबंदी आहे. आणखीही काही संघाचे खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत जायबंदी असल्याने डेव्हिड वॉर्नर संघाचे नेतृत्व ठरणार आहे. दुसरीकडे KKR चा कर्णधार श्रेयस अय्यर देखील दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे कोलकाताचा संघ कुणाला नेतृत्वाची संधी देणार यावर चर्चा सुरू आहे. तशातच, भारतीय डावखुरा फलंदाज नितीश राणा (Nitish Rana) याला संघाचे कर्णधार म्हणून निवडण्यात आले आहे. KKRने तशी घोषणा आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून केली आहे.
'कोलकाता नाइट रायडर्स आज अशी घोषणा करत आहे की नितीश राणा हा श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत संघाचा कर्णधार असेल. श्रेयस अय्यर अद्याप त्याच्या पाठीच्या दुखापतीतून सावरत आहे. आम्हाला आशा आहे की श्रेयस अय्यर लवकरात लवकर बरा होईल आणि यंदाच्या IPL मध्ये एखाद्या टप्प्यात सहभागी होईल. नितीश राणाने आपल्या संघाचे याआधी देशांतर्गत स्तरावर नेतृत्व केले आहे. तो २०१८ पासून आमच्या KKR संघाचा भाग आहे. त्यामुळे त्याच्यावर ही जबाबदारी सोपवताना आम्ही स्वत:ला भाग्यवान समजतो. मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित आणि त्यांचा सपोर्ट स्टाफ यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा संघ नक्कीच उत्तम कामगिरी कले असा आम्हाला विश्वास आहे', असे KKR ने ट्विटमधील फोटोपोस्टमध्ये लिहीले आहे.
श्रेयस अय्यरला नक्की काय झालं?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेदरम्यान श्रेयस अय्यर दुखापतीचा बळी ठरला होता. यानंतर अय्यरवर शस्त्रक्रिया करावी लागू शकते आणि तो बराच काळ मैदानाबाहेर राहणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, त्यानंतर मीडिया रिपोर्ट्समध्ये श्रेयस अय्यरची दुखापत पूर्ण होणार नसल्याचे सांगण्यात आले. त्याचवेळी अय्यरच्या दुखापतीमुळे केकेआरसमोर कर्णधारपदाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आयपीएल सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले असून त्यांच्या कर्णधाराची घोषणा अद्याप झालेली नाही.
कोण होतं स्पर्धेत?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कर्णधारपदासाठी काही नावे पुढे केली जात आहेत. त्यात पहिला म्हणजे मराठमोळा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर. याशिवाय तीन बडे परदेशी खेळाडूही या स्पर्धेत आहेत असे बोलले जात आहे. त्यापैकी एक म्हणजे सुनील नरेन. तो दीर्घकाळ संघाशी जोडला गेला आहे. दुसरा म्हणजे आंद्रे रसेल. रसेल हा संघाचा कणा आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. आणि तिसरा पर्याय म्हणजे अत्यंत अनुभवी शाकीब अल हसन. शाकिबने अनेक वर्ष बांगलादेशचे कर्णधारपद भूषवले आहे. पण बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या ना-हकरत प्रमाणापत्रामुळे त्याचा हंगामातील सहभाग अद्याप निश्चित नाहीये. मात्र या साऱ्यांना मागे टाकत नितीश राणाने बाजी मारली.