मुंबई येथे आयोजित आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अधिवेशनात क्रिकेटचा अधिकृतपणे लॉस एंजेलिस ऑलिम्पिक २०२८ मध्ये समावेश करण्यात आला आहे. शुक्रवारीच हे जवळपास निश्चित झाले होते कारण आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (IOC) कार्यकारी मंडळाने शुक्रवारी आयोजन समितीच्या या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. मुंबईत झालेल्या आयओसीच्या अधिवेशनात मतदान झाले, त्यानंतर त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
थॉमस बाख यांनी मतदानानंतर सांगितले की, दोन आयओसी सदस्यांनी प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले तर एक सदस्य अनुपस्थित राहिला. याशिवाय इतर सर्वांनी या प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे. या प्रस्तावात क्रिकेटशिवाय सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, स्क्वॅश आणि लॅक्रोसचाही ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला होता.
लॉस एंजेलिस ऑलिम्पिक आयोजन समितीने महिला आणि पुरुष गटात सहा संघांची स्पर्धा प्रस्तावित केली आहे. युनायटेड स्टेट्स हा यजमान संघ असेल, जरी संघ आणि पात्रता प्रक्रियेबद्दल अंतिम निर्णय नंतरच्या तारखेला घेतला जाईल. आयओसीचे क्रीडा संचालक किट मॅककोनेल म्हणाले, 'सांघिक खेळात प्रत्येक इव्हेंटमध्ये सहा संघ असावेत असा प्रस्ताव आहे. संघांची संख्या आणि पात्रता यावर अद्याप तपशीलवार चर्चा केलेली नाही. 2025 च्या आसपास यावर निर्णय घेतला जाईल.