बीसीसीआयनं शुक्रवारी इंग्लंड दौऱ्यासाठी २० सदस्यीय जम्बो संघ जाहीर केला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील हा संघ लंडनमध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल अन् इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या संघात कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, आर अश्विन, मोहम्मद शमी या नियमित खेळाडूंचा समावेश आहेच. शिवाय शार्दूल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल व मोहम्मद सिराज यांनी आपले स्थान कायम राखले आहे. आर अश्विन व हनुमा विहारी यांचे पुनरागमन ही संघासाठी मोठी गोष्ट आहे.
राखीव खेळाडूंमध्ये अभिमन्य इस्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि अर्जान नगवस्वाला यांचा समावेश आहे. इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाला इंग्लंड दौऱ्यावर संधी मिळणे, ही खूप मोठी गोष्ट आहे. पण, त्याच्यासमोर नवं संकट उभं राहिलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा गोलंदाज प्रसिद्धला कोरोना झाल्याची माहिती समोर आली आहे. KKRच्या ताफ्यातील कोरोना पॉझिटिव्ह सापडलेला तो चौथा खेळाडू आहे. यापूर्वी वरुण चक्रवर्थी, संदीप वॉरियर्स व टीम सेईफर्ट यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
- सलामीवीर : रोहित शर्मा, शुभमन गिल आणि मयंक अग्रवाल.
- मधली फळी : चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल (फिट असल्यास), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी.
- यष्टिरक्षक : ऋषभ पंत आणि रिद्धिमान साहा (फिट असल्यास).
- अष्टपैलू व फिरकीपटू : रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल.
- वेगवान गोलंदाज : जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर आणि उमेश यादव.
राखीव : अभिमन्यू ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्जन नगवासवाला.