आयपीएल सुरु होण्यापूर्वी क्रिकेटरसिकांना मोठा धक्का बसला आहे. भारताचा तेजतर्रार गोलंदाज मोहम्मद शमी यंदाच्या आयपीएलच्या पूर्ण मालिकेतून बाहेर झाला आहे. शमीवर सध्या लंडनमध्ये शस्त्रक्रिया करण्याची गरज भासली आहे. यामुळे इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेला मुकलेल्या शमीला आयपीएल देखील खेळता येमार नाहीय.
करोडो रुपये खर्चून गुजरात टाइटन्सने शमीला संघात घेतले होते. आता गुजरातला मोठा झटका बसला आहे. पीटीआयला बीबीसीआयच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. यानुसार शमीच्या घोट्याला दुखापत झाली होती. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात लंडनला तो खास इंजेक्शन घेण्यासाठी गेला होता. तिथे त्याला तीन आठवडे हलके धावण्यास सांगितले होते. यानंतर त्याला हे इंजेक्शन देण्यात आले होते.
परंतु या इंजेक्शनचा काहीही उपयोग शमीला झालेला नाहीय. यामुळे आता त्याच्याकडे सर्जरीचाच एकमेव पर्याय उरला आहे. यामुळे पुन्हा शमी इंग्लंडला रवाना होणार आहे. यामुळे तो आयपीएलमध्ये खेळू शकणार नाहीय, असे या सुत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले आहे. दुखापत झालेली असतानाही शमी वर्ल्डकपमध्ये खेळला होता. गोलंदाजी करताना त्याला लँडिंगमध्ये अडचणी येत होत्या. वेदना होत होत्या. परंतु त्यानंतर त्याला लगेचच उपचारासाठी पाठविण्यात आले होते. नोव्हेंबरनंतर शमी एकही सामना खेळलेला नाहीय.