Champions Trophy 2025 ( Marathi News ) : पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार रंगणार आहे. मात्र भारतीय संघ या स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाणार की नाही, याबाबत सुरुवातीपासून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. अशातच आता याबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाण्याची शक्यता धूसर झाल्याचे समजते. सुरक्षेच्या कारणास्तव बीसीसीआयने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाणार नाही. आमचे सामने दुबई किंवा श्रीलंका या ठिकाणी आयोजित करा, अशी विनंती लवकरच बीसीसीआयकडूनआयसीसीकडे केली जाणार असल्याचं बीसीसीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.
भारत-पाक सामन्याचंही ठिकाणही करण्यात आलं होतं निश्चित
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या १५ सामन्यांचे वेळापत्रक पाठवले आहे. पीसीबीने दिलेल्या वेळापत्रकानुसार भारताचे सर्व सामने लाहोरमध्ये होतील. येथे कडक सुरक्षा व्यवस्था असेल अशी हमी पीसीबीने दिली होती. लाहोर, रावळपिंडी आणि कराची या तीन ठिकाणी चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने होतील, असंही या वेळापत्रकातून स्पष्ट करण्यात आलं होतं.
कधी होणार चॅम्पियन्स ट्रॉफी?
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ही स्पर्धा १९ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत खेळवली जाईल. १० मार्च हा राखीव दिवस असेल. ९ तारखेला होणाऱ्या अंतिम सामन्यात पावसामुळे अथवा अन्य कोणत्या कारणाने व्यत्यय आल्यास राखीव दिवशी हा सामना पार पडेल. या स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तयारी सुरू केली आहे. याआधीही भारताने घेतली आहे कठोर भूमिका
सुरक्षेच्या कारणास्तव अनेकदा भारताने आपला संघ शेजारील देशात पाठवण्यास विरोध दर्शवला. आशिया चषक २०२३ चे यजमानपद पाकिस्तानकडे होते. मात्र, बीसीसीआयने भारताचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवण्याचा आग्रह धरला. त्यानुसार भारतीय संघाने श्रीलंकेच्या धरतीवर सामने खेळून जेतेपद पटकावले. भारताची आर्थिक राजधानी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकही द्विपक्षीय मालिका झाली नाही. २०१२ पासून हे कट्टर प्रतिस्पर्धी केवळ आशिया चषक आणि आयसीसी स्पर्धांमध्ये आमनेसामने असतात. २००७ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात शेवटचा कसोटी सामना झाला होता.