भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. शास्त्री यांच्यासह भरत अरुण ( गोलंदाजी प्रशिक्षक), आर श्रीधर ( क्षेत्ररक्षण प्रशिक्षक) आणि विक्रम राठोड ( फलंदाजी प्रशिक्षक) हेही त्यांच्या करारात वाढ करण्यास इच्छूक नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा दिग्गज फलंदाज राहुल द्रविड याचं नाव या पदासाठी पुढे आले आहे. रवी शास्त्री यांच्या भविष्याबाबत चर्चा करण्यासाठी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह हे लंडनला दाखल झाले आहेत. ( Team India head coach Ravi Shastri will part ways with the national team after the T20 World Cup)
इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार शास्त्री यांनी त्यांचा निर्णय बीसीसीआय सदस्यांना कळवला आहे. टीम इंडियाच्या स्टाफ सदस्यांमधील काही जणांनी आयपीएल फ्रँचायझींशी बोलणीही सुरू केली आहे. आयपीएल फ्रँचायझींसोबत काम करण्याची त्यांची इच्छा आहे. दुसरीकडे बीसीसीआयनं राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुख पदासाठी अर्ज मागवले आहेत. सध्या ही जबाबदारी राहुल द्रविडकडे आहे, पण बीसीसीआयच्या या भूमिकेमुळे आता त्याच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
''रवी शास्त्री यांचा कार्यकाळ नोव्हेंबर २०२१मध्ये संपत आहे आणि त्यांच्यानंतर या पदासाठी राहुल द्रविड हा योग्य व सक्षम दावेदार आहे. त्यामुळे राहुल द्रविड टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदावर विराजमान होण्याची शक्यता बळावली आहे. तो तळागळापासूनच या सिस्टमचा भाग आहे,''असे बीसीसीआयच्या सूत्रांनी PTIशी बोलताना सांगितले.
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी वयोमर्यादा ही ६० वर्ष आहे आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीसाठीही तिच मर्यादा आहे. रवी शास्त्री यावर्षी ५९ वर्षांचे झाले. संघ संचालक म्हणून त्यांनी २०१४ ते २०१६ या कालावधीत टीम इंडियासोबत काम केले. त्यानंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी ( २०१७) फायनलमधील पराभवानंतर अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षकपदाचा कार्यभार सोडला. त्यांच्याजागी शास्त्री यांची निवड झाली. शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियानं ऑस्ट्रेलियात सलग दोन कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला,तर आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये आणि २०१९च्या वनडे वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. घरच्या मैदानावर टीम इंडियानं ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांचे वस्त्रहरण केले. वेस्ट इंडिज व श्रीलंका यांचाही सुफडा साफ केला.