भारतीय क्रिकेटपटूंची दमछाक होणारं वेळापत्रकं मागील काही दिवसांत जाहीर झाली आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. तो दौरा संपल्यावर लगेच टीम इंडियाचे प्रमुख खेळाडू आयपीएल २०२१च्या उर्वरित ३१ सामन्यांसाठी ( IPL 2021 Remaining Matches) यूएईत दाखल होईल आणि आता आयपीएल २०२१ची फायनल होताच दोन दिवसांत ट्वेंटी-२० वर्ल्ड कप ( ICC T20 World Cup ) स्पर्धा सुरू होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तारखा समोर आल्या आहेत आणि त्यानुसार भारतीय खेळाडूंसह आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या व राष्ट्रीय संघाचा भाग असलेल्या प्रत्येक खेळाडूची दमछाक होणार आहे.
WTC Final गमावल्यानंतर BCCIला जाग आली; विराट कोहलीनं पुकारलं बंड अन् जय शाह यांनी दखल घेतली
ESPNcricinfoने दिलेल्या वृत्तानुसार आयसीसी ट्वेटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा १७ ऑक्टोबरला सुरू होणार असून अंतिम सामना १४ नोव्हेंबरला होणार आहे. ही स्पर्धा यूएईतच होणार असल्याचे वृत्त या वेबसाईटनं प्रसिद्ध केलं आहे. कोरोना व्हायरसमुळे स्थगित करण्यात आलेल्या आयपीएल २०२१चे उर्वरित सामने १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत यूएईत होतील, अशी घोषणा बीसीसीआयनं आधीच केली आहे. त्यामुळे आयपीएल फायनल संपताच दोन दिवसांत ट्वेंटी-२० वर्ल्डकपचा रणसंग्राम सुरू होईल. ( T20 World Cup 2021 is set to start days after the IPL final, which is likely to be held on October 15)
यंदाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा भारताचा होता. देशातील कोरोना परिस्थितिचा आढावा घेऊन अंतिम निर्णय घेण्यासाठी बीसीसीआयनंआयसीसीकडे मुदतवाढ मागितली होती. २८ जूनला ती मुदत संपत आहे. दरम्यान, बीसीसीआयनं ही स्पर्धा यूएईत हलवण्याचे अधिकृत पत्र अद्याप आयसीसीला दिलेले नाही. त्यामुळे स्पर्धा नेमकी कुठे होईल, यावरून संभ्रम आहेच. पण, हाती आलेल्या माहितीनुसार ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणाऱ्या १६ संघांची दोन गटांत विभागणी करण्यात येईल आणि त्यांचे सामने यूएई व ओमान येथे खेळवण्यात येतील. ( first round of the T20 World Cup will be split across two groups and played in the UAE and Oman.)