इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ( RCB) ८ पैकी ७ सामन्यांत पराभव पत्करावा लागला आणि २ गुणांसह ते तालिकेत सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहेत. आता स्पर्धेत कायम राहण्यासाठी त्यांनी उर्वरित सहा सामने जिंकण्यासोबतच इतरांच्या निकालांवर अवलंबून रहावे लागणार आहे. काल कोलकाता नाईट रायडर्सने १ धावेने त्यांचा पराभव केल्याने मार्गातील अडचणी आणखी वाढवल्या. त्यात अधिक भर पडली आहे, स्टार फलंदाज विराट कोहली याच्यावर BCCI ने कारवाई केली आहे.
२२३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बंगळुरूने २२१ धावांपर्यंत मजल मारली. हा सामना विराट कोहलीच्या विकेटवरून गाजला. हर्षित राणाच्या स्लोव्हर फुलटॉसवर विराट झेलबाद झाला, परंतु विराटच्या मते तो नो बॉल होता. त्यावरून किंग कोहलीने जाहीर नाराजी व्यक्त केली आणि अम्पायरसोबत राडाही घातला. पण, नियमानुसार विराट बाद राहिला. इतकेच नाही, पॅव्हेलियनच्या दिशेने जाताना त्याने डस्टबिनवर जोरात बॅट आदळली. त्याच्या या वागण्याची बीसीसीआयने गंभीर दखल घेतली आणि त्याच्याकडून दंड म्हणून मॅच फीमधील ५० टक्के रक्कम वसूल केली.
नियम काय सांगतो?
उंचीचा नो बॉल हा फलंदाजाची उंची आणि बॅटिंग क्रिज या दोन गोष्टींशी संबंधित असतो. यंदा आयपीएल मध्ये प्रत्येक खेळाडूची सरळ उभे राहिलेले असतानाची उंची मोजण्यात आली आहे. त्यानुसार उंचीचा नो-बॉल आहे की नाही हे पाहिले जाते. विराट कोहलीला टाकलेला चेंडू फुलटॉस होता आणि विराट कोहली त्यावेळी क्रिजपासून बराच पुढे होता आणि आपल्या पायाच्या बोटांवर होता. चेंडू फुलटॉस असल्यामुळे खालच्या दिशेने जात होता. विराट कोहली जर क्रीज मध्ये उभा असता तर तो चेंडू त्याच्या कमरेच्या उंचीपेक्षा खाली आला असता असा अंदाज बॉल प्रोजेक्शन मध्ये दाखवण्यात आला. याचाच अर्थ विराट क्रिजच्या पुढे गेला नसता तर हा चेंडू त्याला कमरेखाली खेळता आला असता.