- अयाझ मेमन
मुंबई - मालिकेत ०-२ अशा पिछाडीवर पडल्यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका गमावणार अशी शक्यता होती. पण तिसऱ्या सामना जिंकून भारताने ज्याप्रकारे पुनरागमन केले आहे, ते पाहता एक गोष्ट निश्चित झाली की, भारतीय संघात गुणवत्ता खूप आहे. कर्णधार विराट कोहलीसह इतर प्रमुख फलंदाजही फॉर्ममध्ये आले आहेत. तसेच गोलंदाजीला अधिक धार आली आहे. माझ्यामते गोलंदाजांसाठी संरक्षण करण्यास पुरेसे ठरेल इतकी धावसंख्या फलंदाजांनी उभारली, तर भारतीय संघ इंग्लंडच्या तुलनेत सरस आहे. सध्या इंग्लंडचा संघ विखुरलेला दिसत असल्याने चौथ्या सामन्यासाठी परिस्थिती कशीही असली, तरी त्याचा फायदा भारताला होईल.
युवा पृथ्वी शॉची संघात झालेली निवड आनंदाची बाब आहे. पण चौथ्या कसोटीसाठी त्याला संघात स्थान मिळण्याची शक्यता कमी वाटते. कारण, शिखर धवन - लोकेश राहुल यांची सलामी जोडी कायम राखण्यात येईल. तरी पृथ्वीसाठी ही निवड अत्यंत महत्त्वाची आहे. कारण वयाच्या १९व्या वर्षी भारतीय संघाच्या डेÑसिंग रुममध्ये राहण्याची संधी मिळत असेल, तर खूप शिकण्यास मिळते. यामुळे त्याला नक्कीच खूप प्रोत्साहन मिळेल. जर त्याला अंतिम संघात स्थान मिळाले, तर त्याच्यासाठी याहून मोठी संधी दुसरी नसेल. माझ्या मते जर चौथ्या सामन्यात धवन अपयशी ठरला, तर पृथ्वीचा क्रमांक लागू शकतो. शिवाय भारत ‘अ’ संघाकडून पृथ्वी इंग्लंडमध्ये खेळला आहे. माझ्यामते गेल्या सहा आठवड्यांपासून तो येथे खेळत होता. त्यामुळे इंग्लंडच्या वातावरणाचा त्याच्याकडे चांगला अनुभवही आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची कामगिरी चमकदार ठरत असली, तरी कबड्डीमध्ये मात्र भूकंप आला, असे म्हणावे लागेल. पुरुष व महिला अशा दोन्ही गटात भारताला सुवर्ण पदकापासून वंचित रहावे लागले आणि याची कोणी कल्पनाही केली नव्हती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इतर कोणत्या खेळात सुवर्ण मिळो अथवा न मिळो, पण कबड्डीमध्ये मात्र भारताचे सुवर्ण निश्चित मानले जात होते. पण असे झाले नाही. भारताच्या दोन्ही संघांना इराणने नमवले. आता या पराभवाची नक्कीच चौकशी होईल. पण माझ्या मते भारताची कबड्डीमधील पकड सुटू लागली असून इतर देशांनी या खेळात मोठी प्रगती केली आहे. गेल्या तीन सत्रांतील भारत - इराण सामन्यावर नजर टाकल्यास दिसून येईल की, तिन्ही वेळा इराणने आघाडी घेतली होती आणि त्यानंतर भारताने पुनरागमन करत बाजी मारली. त्यामुळे भविष्यात इराणविरुद्ध खेळणे भारतासाठी सोपे नसेल असा इशारा तेव्हाच मिळाला होता आणि आता झालेही तसेच. विशेष म्हणजे भारताचा पुरुष संघ साखळी फेरीत दक्षिण कोरियाविरुद्धही पराभूत झाला होता. त्यामुळे आता कबड्डीमध्ये मोठी स्पर्धा निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे भारतीय महिलांनीही निराशा केली आणि त्यांनीही तीच चूक केली जी भारताच्या पुरुषांनी केली होती. मला वाटत आता भारतीय कबड्डीमध्ये नव्याने सुरुवात करावी लागेल.
त्याचप्रमाणे इतर खेळांनी भारताला पदक जिंकून दिले आहेत आणि यामध्ये आघाडीवर आहे वुशू खेळ. या खेळाची आधी कोणाला कल्पनाही नसेल. चायनीज मार्शल आर्ट्स असलेल्या या खेळात भारताने चार कांस्य मिळवले. यासह वुशू खेळाची राष्ट्रीय संघटना देशात योग्यप्रकारे कार्यरत असल्याचेही दिसून येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या देशात अनेक प्रकारची गुणवत्ता असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. त्यामुळे यंदाच्या आशियाई स्पर्धेतून भारतासाठी खूप चांगले निकाल मिळत आहेत. याशिवाय बॉक्सिंग, हॉकी, भारोतल्लन, अॅथलेटिक्स यामध्येही भारताला पदकाची सर्वाधिक संधी आहे.
(लेखक लोकमतचे संपादकीय सल्लागार आहेत.)
Web Title: Big opportunity for young earth shaws
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.