R Ashwin IND vs ENG: इंग्लंड दौऱ्याला सुरुवात होण्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला. भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याला इंग्लंडसाठी उड्डाण करण्यास मनाई करण्यात आली. भारतभर सध्या पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. तशातच आर अश्विनची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्याला सराव सामन्यातून वगळलं जाण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अश्विन पाचव्या कसोटीसाठी आपल्या सहकाऱ्यांसोबत इंग्लंडला रवाना झाला नाही. रविचंद्रन अश्विन सध्या क्वारंटाईनमध्ये असून आवश्यक प्रोटोकॉलचे पालन केल्यानंतरच संघात सामील होईल. भारतीय संघ १६ जून रोजी इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाला.
बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, "अश्विनने संघासह इंग्लंडला उड्डाण केले नाही, कारण प्रस्थान करण्यापूर्वी त्याची कोविडसाठी सकारात्मक चाचणी झाली. पण १ जुलैपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यापूर्वी तो वेळेत बरा होईल, अशी आम्हाला आशा आहे. तथापि, तो लीसेस्टरशायर विरुद्धचा सराव सामना मिस करू शकतो. कसोटी संघातील बहुतांश सदस्य आधीच लीसेस्टरमध्ये आहेत. या खेळाडूंनी गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर यांच्या देखरेखीखाली सराव सुरू केला आहे", असेही त्यांनी सांगितले.