मुंबई : संघाची कामगिरी चांगली झाली नाही तर पहिली गाज कर्णधार आणि प्रशिक्षकावर येते. सध्याच्या घडीला संघाची कामगिरी चांगली होताना दिसत नाही. त्यामुळे आता मुंबईकर प्रशिक्षकाला संघातून डच्चू मिळू शकतो.
एकेकाळी भारतीय संघाच ७-८ मुंबईचे खेळाडू असायचे. पण काळ बदलत गेला तशी या खेळाडूंची संख्या रोडावत गेली. सध्याच्या घडीला रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, पृथ्वी शॉ, शिवम दुबे, अजिंक्य रहाणेसारखे मुंबईचे खेळाडू भारताच्या संघात दिसतात. रवी शास्त्री हे भारतीय संघाचे प्रशिक्षकही मुंबईचे आहेत.
सध्याच्या घडीला भारतीय संघाची कामगिरी चांगली झालेली नाही. भारताला न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत ३-० असा लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला होता. ट्वेंटी-20 मालिकेतील अपयश विसरून न्यूझीलंड संघानं वन डे मालिकेत दमदार कमबॅक केले. त्यांनी जगातील सर्वोत्तम संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टीम इंडियावर निर्भेळ यश मिळवलं. न्यूझीलंडनं तीन सामन्यांची ही मालिका 3-0 अशी जिंकून भारताला व्हाईटवॉश दिला. भारतीय संघाला 31वर्षांनतर अशा लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावं लागलं.
एकिकडे भारतीय संघाने वनडे मालिका गमावली. दुसरीकडे मुंबईच्या संघाला यावर्षीही साखळी फेरीमध्ये गाशा गुंडाळावा लागला. विनायक सामंत यांच्या प्रशिक्षकपदाखालील मुंबईच्या संघाची यंदा कामगिरी खालावली आणि त्यामुळेच त्यांचे आव्हान संपुष्टात आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळेच आता मुंबई क्रिकेट संघटना सामंत यांना डच्चू देण्याची शक्यता दिसत आहे. सामंत यांच्या जागी लालचंद राजपूत किंवा संजय बांगर यांना मुंबईच्या संघाचे प्रशिक्षकपद मिळू शकते, असे म्हटले जात आहे.