Join us

पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

Pakistan ICC, Champions Trophy 2025: स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वी होणार ट्रॉफीचा दौरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 18:22 IST

Open in App

Pakistan ICC, Champions Trophy 2025: ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या आधी, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्रॉफी टूरची घोषणा केली आहे. 16 नोव्हेंबरपासून हा दौरा सुरू होणार आहे. मात्र त्याआधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. आयसीसीने पीसीबीला ट्रॉफी दौऱ्याचे वेळापत्रक बदलण्यास सांगितले आहे.

ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या आधी आणखी एक मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दुबईहून इस्लामाबादला पाठवली आहे. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड या ट्रॉफी दौऱ्यासाठी सज्ज झाले आहे. म्हणजेच ही ट्रॉफी पाकिस्तानमधील वेगवेगळ्या ठिकाणी चाहत्यांमध्ये नेली जाईल. चॅम्पियन्स ट्रॉफीचा दौराही जाहीर झाला आहे. या दरम्यान ICC ने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का दिला आहे. कारण पाकिस्तानला ट्रॉफी दौऱ्यासाठी तयार करण्यात आलेल्या वेळापत्रकात बदल करावे लागतील.

PCB विरोधात ICC चा मोठा निर्णय

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या म्हणण्यानुसार, चॅम्पियन्स ट्रॉफी १४ नोव्हेंबरला इस्लामाबादमध्ये पोहोचली आहे. आता १६ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर या कालावधीत ट्रॉफी चाहत्यांमध्ये पाकिस्तानातील विविध ठिकाणी नेली जाईल. वेळापत्रकानुसार ही ट्रॉफी स्कर्दू, मुरी, हुंजा आणि मुझफ्फराबाद या ठिकाणी जाईल. यापैकी स्कर्दू, हुंजा आणि मुझफ्फराबाद हे विभाग PoK (पाकव्याप्त काश्मीर) मध्ये येतात. पण ICC ने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा झटका दिला आहे. ICC ने PCB ला चॅम्पियन्स ट्रॉफी दौरा कोणत्याही विवादित क्षेत्रात म्हणजेच PoK (पाकव्याप्त काश्मीर) मध्ये नेण्याची परवानगी नाकारली आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने १४ नोव्हेंबरलाच घोषणा केली होती की, पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींनो, तयार राहा. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या ट्रॉफी दौऱ्याची सुरुवात १६ नोव्हेंबरपासून इस्लामाबाद येथे होणार आहे, जी पुढे स्कर्दू, मुरी, हुंजा आणि मुझफ्फराबाद सारख्या पर्यटन स्थळांनाही भेट देईल. १६-२४ नोव्हेंबर दरम्यान ओव्हल येथे २०१७ मध्ये सरफराज अहमदने उचललेल्या ट्रॉफीची एक झलक पाहा.

प्रथमच वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वी ट्रॉफी दौरा

चॅम्पियन्स ट्रॉफी १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. पण टीम इंडियाने पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्याने आणि प्रत्युत्तरात हायब्रीड मॉडेलसाठी पाकिस्तान तयार नसल्यामुळे वेळापत्रक जाहीर होण्यास विलंब होत आहे. अशा परिस्थितीत, आयसीसीच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असणार आहे, जेव्हा कोणत्याही अधिकृत स्पर्धेच्या वेळापत्रकाशिवाय ट्रॉफी दौरा सुरु होणार आहे. सहसा स्पर्धेचे वेळापत्रक किमान १०० दिवस अगोदर जाहीर केले जाते, त्यानंतरच ट्रॉफीचा दौरा सुरू होतो. मात्र यावेळी काही वेगळेच पाहायला मिळत आहे.

 

टॅग्स :पाकिस्तानआयसीसीपीओकेभारतीय क्रिकेट संघ