दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत ( Rishabh Pant) हा टीम इंडियाचा भविष्याचा कर्णधार असेल, असं मोठं विधान भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांनी केला आहे. त्यांनी यष्टिरक्षक-फलंदाज रिषभचे कौतुक केले. २३ वर्षीय रिषभ हा भविष्यात भारताचा सर्वोत्तम कर्णधार बनेल, असेही गावस्कर यांनी सांगितले. श्रेयस अय्यर यानं दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार घेतली आणि दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व रिषभ पंतकडे आले. रिषभच्या नेतृत्वाखाली दिल्लीनं आयपीएल २०२१त ८ पैकी ६ सामन्यांत विजय मिळवले. प्ले ऑफमध्ये प्रवेश निश्चित करण्यासाठी दिल्लीला उर्वरित सामन्यांत केवळ दोन विजयांची गरज होती. रिषभनं नेतृत्वकौशल्यासोबत फलंदाजीतही आपली धमक दाखवली.
गावस्कर म्हणाले,''युवा कर्णधाराच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सनं दमदार कामगिरी करून दाखवली. सहाव्या सामन्यानंतर त्याला कर्णधारपदाबाबत विचारल्यावर तो कंटाळला होता. प्रत्येकवेळी त्याला तोच प्रश्न विचारला गेला. संधी मिळाल्यास धमाकेदार कामगिरी करून दाखवण्याची प्रचिती त्यानं दिली. त्याच्याकडूनही चूका झाल्या, कोणत्या कर्णधाराकडून होत नाहीत?.''
''पण आयपीएलच्या काही सामन्यानंतर त्यानं नव्या गोष्टी शिकण्यात हुशारी दाखवली आणि अनेक निर्णयानं ते सिद्धही केलं. तो भारताचा भविष्य आहे आणि त्यात काहीच शंका नाही,''असेही गावस्कर म्हणाले. पंतनं आयपीएल २०२१त ८ सामन्यांत ३५+च्या सरासरीनं २१३ धावा केल्या.