Join us  

तुम्ही माझ्या कामगिरीची दखल घेणं हीच मोठी बाब; मराठमोळ्या शार्दुलचं आनंद महिंद्रांना उत्तर

ऑस्ट्रेलियातील विजयानंतर पदार्पण केलेल्या नव्या खेळाडूंना महिंद्रा थार गिफ्ट करण्याचा आनंद महिंद्रा यांनी घेतला होता निर्णय

By जयदीप दाभोळकर | Published: January 25, 2021 1:17 PM

Open in App
ठळक मुद्देनव्या खेळाडूंना महिंद्रा थार गिफ्ट करण्याचा आनंद महिंद्रा यांनी घेतला होता निर्णयशार्दुल ठाकुरनं मानले आनंद महिंद्रांचे आभार

भारतानं ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवला. काही सीनिअर खेळाडू दुखापतग्रस्त असतानाही कर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या नेतृत्वाखाली उत्तम कामगिरी करत भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाच्या संघाला धुळ चारली. यानंतर भारतीय संघ भारतात परतल्यानंतर संघातील सर्वच खेळाडूंचं जंगी स्वागतही करण्यात आलं. महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा हेदेखील भारतीय संघाच्या या विजयावर अतिशय खुष आहेत. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेत पदार्पण करणाऱ्या सहा खेळाडूंना महिंद्राची नवी SUV थार गिफ्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आनंद व्यक्त करत ही माहिती दिली होती. त्यांच्या या निर्णायानंतर मराठमोळ्या शार्दुल ठाकुरनं आनंद महिंद्रा यांच्या ट्वीटला रिप्लाय देत त्यांचे आभार मानले आहेत."आनंद महिंद्रा यांच्याकडून मिळालेल्या गिफ्टसाठी मी आभारी आहे. तुम्ही माझ्या कामगिरीची दखल घेणं हीच माझ्यासाठी मोठी बाब आहे. हे सर्वच तरूणांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल याची खात्री आहे. तुम्ही जसं म्हणता तसं अशक्य गोष्टी एक्सप्लोअर केल्या पाहिजेत," असं म्हणत शार्दुल ठाकुरनं आनंद महिंद्रा यांचे आभार मानले आहेत. त्यानं ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली. एकीकडे भारतीय संघाच्या खेळाडूंना या ऐतिहासिक विजयानंतर जगभरातून शुभेच्छा मिळत आहेत. तर दुसरीकडे आनंद महिंद्रा यांनी या खेळाडूंना एसयूव्ही भेट म्हणून देत नव्या खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, टी नटराजन, वॉशिंग्टन सुंदर, शुभमन गिल आणि नवदीप सैनी या सहा खेळाडूंना आनंद महिंद्रांकडून भेट मिळणार आहे. गाबाच्या मैदानात ऑस्ट्रेलियाने ३२ वर्षांत पराभव बघितलेला नव्हता. ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियममध्ये सलग २८ कसोटी सामने सहज जिंकले, अशा प्रकारच्या फुशारक्या मारणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाला अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय युवा ब्रिगेडने जबरदस्त हादरा दिला आणि कांगारूंना चारीमुंड्या चीत केले. अनुभवी आणि दिग्गज खेळाडू जखमी असताना नवख्या चहेऱ्यांनी जिद्दीनं खेळ करत ऑस्ट्रेलियाचे ‘गर्वाचे घर खाली’ केले. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते हे देखील जखमी भारतीय वाघांनी चौथ्या आणि अखरेच्या कसोटी सामन्यात अखेरच्या दिवशी खरे करून दाखविले. ३२८ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने ऑस्ट्रेलियाचा ३ गडी राखून दणदणीत पराभव केला. कसोटी मालिकाही २-१ अशा फरकाने खिशात घातली.

टॅग्स :आनंद महिंद्राशार्दुल ठाकूरभारतआॅस्ट्रेलियामहिंद्राट्विटर