बांगलादेशने पहिल्या कसोटीत न्यूझीलंडला हरवून इतिहास रचला. सिल्हेट येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत बांगलादेशने न्यूझीलंडचा १५० धावांनी पराभव केला आणि २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. बांगलादेशने मायदेशात कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंड संघाचा प्रथमच पराभव केला आहे. या ऐतिहासिक विजयासह बांगलादेशने आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC पॉइंट टेबल) २०२३-२५ च्या गुणतालिकेत भारताला मागे टाकले आहे.
न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर बांगलादेशचे १२ गुण झाले, ज्यामुळे बांगलादेशचा संघ आता WTC गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे आणि भारताला तिसऱ्या स्थानावर ढकलले आहे. भारताचे १६ गुण असले तरी विजयाच्या टक्केवारीत बांगलादेश भारतीय संघाच्या पुढे आहे. ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड अनुक्रमे पुढील तीन स्थानांवर आहेत. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पाकिस्तान संघ २४ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशची विजयाची टक्केवारी १००-१०० आहे तर भारताची ६६.६७ आहे.
न्यूझीलंकडून माजी कर्णधार केन विल्यमसनने पहिल्या डावात शानदार शतक झळकावले होते. पण तरी न्यूझीलंडचा संघ अडचणीत सापडला अन् बांगलादेशने कसोटीवर पकड मजबूत केली. बांगलादेशने पहिल्या डावात ३१० धावा केल्या होत्या. बांग्लादेशचा पहिला डाव ३१० धावांवर आटोपल्यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात ३१७ धावा केल्या. त्यानंतर, मैदानात उतरलेल्या बांग्लादेशने दुसऱ्या डावात ३३८ धावा केल्या होत्या. मात्र, दुसऱ्या डावात न्यूझीलंडचा संघ अवघ्या १८१ धावांत तंबूत परतला. त्यामुळे, बांग्लादेशसाठी आजचा विजयी क्षण ऐतिहासिक ठरला.
भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका-
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली. भारतीय संघ सध्या मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळत आहे. ही मालिका संपताच टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. १० डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. आफ्रिकेच्या धरतीवर भारतीय संघ वन डे, ट्वेंटी-२० आणि कसोटी अशा तीन मालिका खेळणार आहे. भारताच्या वन डे संघाची धुरा लोकेश राहुल, ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सूर्यकुमार यादव आणि कसोटी संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात असणार आहे.