काही वर्षांपूर्वी रिलायन्सच्या जिओ सिनेमाने भारताचे क्रिकेट सामने, अन्य खेळांच्या प्रसारणाचे हक्क मिळविले होते. यामुळे डिस्ने हॉटस्टारची असलेली सद्दी संपली होती. यानंतर आयपीएलसह बहुतांश क्रिकेट सामने हे जिओ सिनेमावरून प्रसारित होत आहेत. परंतू, आता जिओ सिनेमा अॅपही मागे पडणार आहे. २०२५ पासून दुसऱ्याच अॅपवरून आयपीएलसह अन्य क्रिकेट, खेळांचे सामने प्रसारित केले जाणार आहेत.
रिलायन्स आणि डिस्नेने एकत्र येत एक कंपनी बनविली आहे. या कंपनीने आयपीएल २०२५ सारख्या क्रीडा स्पर्धा आणि अन्य स्पोर्ट्स इव्हेंट्स जिओ सिनेमावर न दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी पुन्हा एकदा सर्व क्रिकेट सामने, खेळांचे प्रसारण डिस्ने हॉटस्टारवर घेऊन जाणार आहे, असे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.
भारतातील क्रिकेट सामन्यांचा प्रसारणाचा हक्क हा जिओ सिनेमाकडे आहे. तर आयसीसीच्या सामन्यांच्या प्रसारणाचा हक्क डिस्ने हॉटस्टारकडे आहे. भारत ही क्रिकेटची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. ही बाजारपेठ रिलायन्सकडे गेल्याने हॉटस्टारला मोठा धक्का बसला होता. यानंतर हॉटस्टार भारतातील बिझनेस विकण्याच्या तयारीत आहे, असे वृत्तही पसरले होते. आता रिलायन्स आणि डिस्ने हॉटस्टारच एकत्र आले आहेत.
या दोन कंपन्यांनी फेब्रुवारीत मिळून एक कंपनी बनविली आहे. या कंपनीचे बाजारमुल्य ७१४५५ कोटी रुपये आहे. या कंपनीकडे १२० टीव्ही चॅनल्स आणि दोन स्ट्रिमिंग सर्व्हिस आहेत. कंपनीने सर्व क्रिकेटचे सामने हॉटस्टारवार दाखविण्याच्या वृत्तावर काही अधिकृत खुलासा केलेला नाही.
Disney + Hotstar कडे लाईव्ह स्ट्रिमिंग करण्याचे चांगले तंत्रज्ञान आहे. तसेच ते टार्गेटेड जाहिरातही करू शकतात. यामुळे रिलायन्सने हा निर्णय घेतला असावा असा अंदाज लावला जात आहे.