मुंबई - मुंबई क्रिकेट संघटनेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीला मोठी कलाटणी मिळाली आहे. आज निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना या निवडणुकीत प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता असलेले शरद पवार गट आणि आशिष शेलार गट यांनी युती करत एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आज शरद पवार आणि आशिष शेलार यांच्यात चर्चा झाल्यानंतर एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे.
शरद पवार आणि आशिष शेलार यांचे गट एकत्र आल्याने आता निवडणुकीमध्ये शरद पवार आणि आशिष शेलार असा संयुक्त गट असेल. तसेच ऐनवेळी हे दोन्ही गट एकत्र आल्याने आता शरद पवार गटातील अध्यक्षपदाचे उमेदवार संदीप पाटील यांच्यासह इतर उमेदवारांचं भवितव्य काय असेल, याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, निवडणूक लढवत असलेल्या शरद पवार यांच्या गटामध्ये मिलिंद नार्वेकप आणि जितेंद्र आव्हाड यांचाही समावेश आहे. तर देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अमेल काळे हेही मुंबई क्रिकेट संघटनेची निवडणूक लढवत आहेत.
दरम्यान, या निवडणुकीसाठी शरद पवार यांनी आपला वेगळा गट जाहीर केला होता. तसेच उमेदवारांनी उमेदवारी अर्जही भरले होते. मात्र आज संपूर्ण निवडणुकीलाच अचानक कलाटणी मिळाली. शरद पवार आणि आशिष शेलार यांच्यातील चर्चेनंतर दोन्ही गटांनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. तसेच या संयुक्त गटाचं निवेदनही जाहीर झालं आहे, त्यामुळे आता उर्वरित उमेदवारांचं काय होणार, तसेच निवडणुकीचा काय निकाल लागणार याची उत्सुकता लागली आहे.