मेलबर्न - ऑस्ट्रेलियात सुरू झालेल्या टी-२० विश्वचषकाला सनसनाटी सुरुवात झाली आहे. गटसाखळीत आज श्रीलंका आणि नामिबिया यांच्यात झालेल्या सामन्याचा धक्कादायक निकाल लागला आहे. या सामन्यात आशियाई चॅम्पियन असलेल्या श्रीलंकेवर नामिबियाच्या नवख्या संघाने ५५ धावांनी सनसनाटी विजय मिळवला आहे.
या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून नामिबियाला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केल्यावर नवख्या नामिबियाच्या संघाने सुरुवातीच्या पडझडीतून सावरत श्रीलंकेसमोर १६४ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात निराशाजनक झाली. दुसऱ्याच षटकात कुशल मेंडिस (६) बाद झाला. त्यानंतर बेन शिकोंगोने निसंका (९) आणि गुणतिलका (०) यांना पाठोपाठ बाद करत श्रीलंकेचा डाव अडचणीत आणला. त्यानंतर धनंजय डि सिल्व्हा बाद झाला. तेव्हा श्रीलंकेच्या धावफलकावर ४० धावा लागल्या होत्या.
अशा बिकट अवस्थेतून भानुका राजपक्षे (२०) आणि दसून शणाका (२९) यांनी लंकेला सावरले. मात्र राजपक्षे बाद झाल्यानंतर श्रीलंकेची फलंदाजी पुन्हा कोसळली. हसरंगा (४), शणाका (२९), मदुशान (०) आणि करुणारत्ने (५) हे पाठोपाठ बाद झाल्याने श्रीलंकेची अवस्था ९ बाद ९२ अशी झाली होती. त्यानंतर तीक्षणा आणि चमीरा यांनी शेवटच्या गड्यासाठी १६ धावा जोडत श्रीलंकेला शंभरीपार नेले. मात्र अखेरीस वीजाने चमिराला बाद करत श्रीलंकेडा डाव १०८ धावांवर संपुष्टात आणला. नामिबियाकडून स्कोल्ट्झ, शिकोंगो, फ्रायलिंक आणि वाईज यांनी प्रत्येकी दोन विकेट्स टिपले, तर स्मित याने एक बळी टिपला.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना नामिबियाच्या संघाची सुरुवात चांगली झाली नव्हती. त्यांचे व्हॅन लिंगेन (३) आणि ला कूक (९) दोन्ही सलामीवीर १६ धावांमध्येच माघारी परतले. त्यानंतर इटोन (२०), इरास्मस (२०), ब्राड (२६) आणि वाईस (०) हे ठराविक अंतराने बाद होत गेल्याने नामिबियाची अवस्था ६ बाद ९३ अशी झाली होती.
मात्र अखेरच्या ३४ चेंडूत फ्रायलिंक आणि जेजे स्मित यांनी ७० धावांची तुफानी भागीदारी करत नामिबियाच्या संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. फ्रायलिंकने २८ चेंडूत ४४ तर जेजे स्मित याने १६ चेंडूत नाबाद ३१ धावा कुटत श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. फ्रायलिंक डावातील शेवटच्या चेंडूवर धावबाद झाला. दरम्यान, श्रीलंकेकडून मदुशान याने दोन, तर तीक्षणा, चमीरा, करुणारत्ने आणि हसरंगा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.