मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सदस्य एस श्रीसंत सध्या BIGG BOSS च्या घरात सहभागी झालेला आहे. बुधवारी झालेल्या भागात महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची एक आठवण सांगताना त्याला अश्रु अनावर झाले. भारताने 2007 साली ट्वेंटी-20 क्रिकेट विश्वचषक आणि 2011मध्ये वन डे विश्वचषक उंचावला. या दोन्ही विश्वविजेत्या संघात श्रीसंतचा सहभाग होता.
2007च्या ट्वेंटी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत श्रीसंतने पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह-उल-हकचा झेल टिपून भारताला जेतेपद जिंकून दिले होते. मात्र, आयपीएलमधील फिक्सिंग प्रकरणात तो दोषी आढळला आणि त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला ब्रेक लागला. श्रीसंत भारतीय संघासोबतच्या आठवणीत रमत आहे आणि BIGG BOSS 12 मध्ये त्याने सचिन तेंडुलकरसोबतची एक आठवण सांगितली.
2013च्या आयपीएल मॅच फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळलेल्या श्रीसंतवर बंदी घालण्यात आली आहे. त्याला दिल्ली पोलिसांनी अटकही केली होती. जुलै 2015 मध्ये त्याची स्पॉट फिक्सिंग प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली, परंतु बीसीसीआयने त्याच्यावरील आजीवन बंदी अद्याप उठवलेली नाही. त्याविरोधात त्याचा लढा सुरू आहे. या कार्यक्रमात त्याने पुन्हा भारतीय संघाकडून खेळण्याची आशा व्यक्त केली.