भारतीय संघाचा स्टार यष्टिरक्षक रिषभ पंत हा उत्तराखंडमधील घरी जाताना त्याच्या कारला भीषण अपघात झाला होता. या अपघातात रिषभ पंत गंभीर जखमी झाला होता. काही दिवस देहराडूनमधील रुग्णालयात उपचार केल्यानंतर रिषभ पंतला अधिक उपचारांसाठी मुंबईत आणण्यात आले आहे. तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, रिषभ पंतला झालेल्या दुखापतीबाबत आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. या माहितीमुळे भारतीय क्रिकेटला मोठा धक्का बसण्याची शक्यता असून, क्रिकेटप्रेमींची निराशा होण्याची शक्यता आहे.
एका रिपोर्टनुसार मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत असलेला रिषभ पंत हा २०२३ मधील बहुतांश काळ क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहण्याची शक्यता आहे. या माहितीमुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. त्याचं कारण म्हणजे या वर्षभरात कसोटी अजिंक्यपद आणि क्रिकेट वर्ल्डकप अशा आयसीसीच्या दोन महत्त्वाच्या स्पर्धा आहेत. त्याबरोबरच रिषभ पंत हा यावर्षीच्या आयपीएलमध्येही खेळणार नाही हे जवळपास निश्चित झाले आहे.
पंतच्या दोन लिगामेंटला दुखापत झाली होती. त्यावर मुंबईतील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सहा आठवड्यानंतर त्याच्यावर तिसरी शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे यावर्षातील त्याला बहुतांश काळ मैदानाबाहेरच राहावे लागणार आहे.
रिषभ पंत हा मैदानावर पुन्हा कधी परतणार याबाबत डॉक्टरांनी निश्चित वेळमर्यादा दिलेली नाही. मात्र बीसीसीआय आणि निवड समितीने रिषभ पंत हा किमान सहा महिन्यांसाठी क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहील, असा निष्कर्ष काढला आहे. रिषभ पंतने आपला शेवटचा सामना बांगलादेशविरुद्ध खेळला होता. त्या सामन्यात त्याने ९३ धावांची जबरदस्त खेळी केली होती. तसेच पहिल्या सामन्यातही त्याने ४६ धावांची आक्रमक खेळी केली होती.
दरम्यान, रिषभ पंतच्या अनुपस्थितीत निवड समितीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी के.एस. भरत आणि ईशान किशन यांची यष्टीरक्षक म्हणून निवड केली आहे. दरम्यान, या मालिकेत ईशान किशन हा प्रमुख यष्टीरक्षक राहण्याची शक्यता आहे.