टीम इंडियाचा क्रिकेटर मयांक अग्रवाल ( Mayank Agarwal) गेल्या वेळी विमानाने प्रवास करत असताना आजारी पडला. मात्र यावेळी या क्रिकेटपटूने कोणताही धोका पत्करला नाही आणि स्वत:ची पाण्याची बाटली घेऊन फ्लाइटमध्ये प्रवास करताना दिसला. जानेवारीत विमानात पाणी प्यायल्याने त्याची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर मयांकला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या प्रसंगानंतर सावध झालेला मयांकने यावेळी पूर्ण काळजी घेतली आणि पाण्याची बाटली दाखवताना त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये म्हटले, 'कोणतीही रिस्क घ्यायची नाही बाबाsss.'
रणजी करंडक स्पर्धेतील कर्नाटकचा कर्णधार अग्रवाल त्याच्या सहकाऱ्यांसोबत त्रिपुराहून नवी दिल्लीला जात असताना त्याच्यासोबत हा प्रकार घडला. टेक ऑफच्या काही वेळापूर्वीच अग्रवाल आजारी पडले. मयांकने पाऊचमध्ये पाणी आहे असे समजून तो प्यायला होता. पण, त्यानंतर त्याला त्रास झाला आणि छातीत जळजळ होऊ लागली. यानंतर मयांकला आगरतळा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मयांक अग्रवाल सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. त्याने २०२२ मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारताकडून शेवटची कसोटी खेळली होती. मयांकने शेवटचा वन डे सामना २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. कर्नाटकसाठी मयंक चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने गुजरात आणि गोव्याविरुद्ध शतके झळकावली आहेत. मयंकने भारतासाठी २१ कसोटींत ४१.३३ च्या सरासरीने एकूण १४८८ धावा केल्या आहेत.