विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामना आज कर्नाटक आणि तामीळनाडू यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्यात कर्नाटकचा प्रभावी गोलंदाज अभिमन्यू मिथून यानं ऐतिहासिक कामगिरी केली. विशेष म्हणजे आज त्याचा 30वा वाढदिवस आहे आणि आजच्या दिवशी इतिहासात स्वतःचं नाव नोंदवून अभिमन्यूनं स्वतःला अनोखी भेट दिली. अभिमन्यूनं अंतिम सामन्यात हॅटट्रिक घेतली आणि त्यानं 34 धावांत 5 फलंदाज माघारी पाठवून तामीळनाडूचा डाव 252 धावांत गुंडाळला.
विजय हजारे चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हॅटट्रिक घेणारा अभिमन्यू पहिला गोलंदाज ठरला आहे. शिवाय कर्नाटकसाठी लिस्ट A क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेण्याचा पहिला मानही त्यानं पटकावला. रणजी करंडक आणि विजय हजारे अशा दोन्ही स्पर्धेत हॅटट्रिक अभिमन्यूनं नावावर केली आहे.