नवी दिल्ली - भारताचा माजी कर्णधार आणि अंडर-19 चा प्रशिक्षक 'द वॉल' राहुल द्रविडचा उद्या वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसाआधीच मुलानं त्याला खूशखबर दिली. राहुलचा मुलगा समितनं शालेय क्रिकट स्पर्धेत 150 धावांची तुफानी खेळी करत वडिलांना वाढदिवसाचं गिफ्टच दिलं आहे. कर्नाटक क्रिकेट संघटनेने आयोजित केलेल्या शालेय स्तरावरील क्रिकेट स्पर्धेत ज्यूनिअर 'द वॉल' समितने शानदार शतक तडकावले. माल्या आदिती इंटरनॅशनल स्कूल आणि विवेकानंद स्कूल या संघांमध्ये हा सामना झाला. यात समितने माल्या आदिती इंटरनॅशनल स्कूलचे प्रतिनिधित्व करताना ही खेळी साकारली. त्यानं अंडर-14 स्पर्धेत तुफानी फटकेबाजी करत वाहवा मिळवली आहे.
द्रविडचा मुलगा समितसह भारताचा माजी गोलंदाज सुनील जोशी यांचा मुलगा आर्यननेही या सामन्यात दीडशतकी खेळी केली. समित आणि आर्यनच्या फटकेबाजीच्या जोरावर माल्या आदिती इंटरनॅशनल स्कूलच्या संघाने 50 षटकात 5 बाद 500 धावा तडकावल्या.
फलंदाजांनंतर गोलंदाजांनीही धारधार गोलंदाजी करत विवेकानंद स्कूल संघाला 88 धावांत बाद गारद केले आणि माल्या आदिती इंटरनॅशनल स्कूलला 412 धावांनी विक्रमी विजय मिळवून दिला.
अंडर-14मध्ये ज्यूनिअर 'द वॉल'ने याआधीही शानदार खेळ केला आहे. दोन वर्षांपूर्वी बंगळुरू युनायटेड क्रिकेट क्लबचे प्रतिनिधित्व करताना समितने 125 धावांची खेळी केली होती. 2015मध्ये समितला अंडर-12 गोपालन क्रिकेट चॅलेजचा सर्वश्रेष्ठ फलंदाजचा किताब जिंकला होता.
सुनील जोशी हे सध्या बांगलादेश संघाचे फिरकी गोलंदाज मार्गदर्शक म्हणून काम पाहतात तर राहुल द्रविड सध्या न्यूझीलंडमध्ये भारतीय अंडर -19 संघाचा प्रशिक्षक म्हणून गेला आहे. उद्या आपला 45 वा वाढदिवस साजरा करत असलेल्या राहुल द्रविडला समितकडून हे खास बर्थडे गिफ्ट समजलं जात आहे.