नवी दिल्ली : भारताचा माजी गोलंदाज आशीष नेहराचा आज 40वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने नेहराबद्दलच्या कुणाला माहिती नसलेल्या गोष्टी बाहेर पडत आहेत. त्यामध्येच नेहराचे एका मुलीशी सात वर्षे अफेअर सुरु असल्याची बाब पुढे आली आहे.
ही गोष्ट आहे 2002 सालामधील. नेहरा आणि या मुलीची भेट इंग्लंडमध्ये एका सामन्यादरम्यान झाली. त्यानंतर दोघांमध्ये संवाद झाला. दोघांच्या गाठी-भेटी वाढत गेल्या आणि त्यांच्यामध्ये अफेअर सुरु झाले. हे अफेअर तब्बल सात वर्षे चालले. त्यानंतर फक्त पंधरा मिनिटांमध्ये नेहराने त्या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि आठवड्याभरात त्यांचे लग्नही झाले. ही मुलगी होती ती रुश्मा. नेहरा आणि रुश्मा यांचे 2009 साली लग्न झाले आणि त्यांना आता दोन मुलंही आहेत.
18 वर्षांच्या काळात जवळपास 12 शस्रक्रिया झेलूनही नेहराने क्रिकेटच्या मैदानातील आपले स्थान कायम राखले. 1999 साली पहिल कसोटी सामना खेळणाऱ्या आशिष नेहराला कसोटी क्रिकेटमधील कारकीर्द फार बहरू शकली नाही. पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये मात्र त्याने आपली उपयुक्ततता वेळोवेळी सिद्ध केली.
आशिष नेहराचे नाव आले की, 2003 च्या विश्वचषकातील इंग्लंडविरुद्धची साखळी लढत नरजेसमोर यायलाच हवी. नासिह हुसेन, मायकेल ट्रेस्कोस्ट्रिक, अँड्यू फ्लिंटॉफ अशा फलंदाजांसमोर नेहराने आपल्या कारकीर्दीतील सर्वात संस्मरणीय स्पेल टाकला होता. त्या लढतीत टिपलेले 23 धावांत 6 बळी ही त्याची कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली. श्रीलंकेविरुद्धचा असाच एक सामना नेहराने शेवटच्या षटकात जिंकून दिला होता. त्यावेळी श्रीलंकेने भारताने दिलेल्या 400 धावांच्या आव्हानाचा जवळपास पाठलाग केला होता. पण नेहराने टाकलेले शेवटचे षटक भारतासाठी निर्णायक ठरले होते.
चांगला डावखुरा गोलंदाज असूनही सातत्याने होणाऱ्या दुखापती आणि कामगिरीतील सातत्याचा अभाव यामुळे नेहराचे संघातून येणे जाणे सुरूच राहिले. एक वेळ तर अशी आली की आशिष नेहरा हे नाव सर्वांच्या विस्मृतीत गेले होते. पण 2009च्या सुमारास नेहराचे भारतीय संघात पुनरागमन झाले. 2011 च्या विश्वचषक स्पर्धेपर्यंत तो भारतीय संघातून खेळला. पण या विश्वचषकानंतर निवड समितीने एकदिवसीय क्रिकेटमधील निवडीसाठी नेहराच्या नावावर फुली मारली. त्यामुळे नेहराची कारकीर्द संपल्यात जमा होती.
पण आयपीएलमध्ये चमक दाखवत नेहरा ट्वेंटी-20 च्या मैदानात परतला. नुसता परतलाच नाही तर भेदक गोलंदाजी करत टी-20 मधील भारताचा महत्त्वाचा गोलंदाजही बनला. 2016 साली झालेल्या टी-20 विश्वचषकात तो भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाजही ठरला होता. पण वाढते वय आणि दुखापती यामुळे नेहराच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सहभागाला मर्यादा आल्या.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत संघात निवड होऊनही अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान न मिळाल्याने नेहराला आपली कारकीर्द आखेरच्या टप्प्यात आल्याची जाणीव झाली होती. त्यानेही समजुतदारपणा दाखवत न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानात होणाऱ्या टी-20 लढतीनंतर निवृत्ती स्वीकारण्याची घोषणा करून टाकली. आज दिल्लीचा हा वेगवान गोलंदाज कुटुंबीय व प्रेक्षकांच्या उपस्थितीत अखेरची लढत खेळण्यासाठी मैदानात उतरेल, त्य वेळी निश्चितच मैदानात व बाहेरचे वातावरण भावनिक होईल. पण एक मेहनती आणि जिद्दी खेळाडू म्हणून भारतीय क्रिकेट त्याला कायम आठवणीत ठेवेल.